सातारा: कडक शिस्तीचे आणि धडाकेबाज पोलिस अधिकारी म्हणून ओळख असलेले सुरज गुरव यांची सातारा जिल्ह्याच्या अप्पर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी कराड येथे यापूर्वी काम केले असून त्यांच्या या नियुक्तीमुळे पोलिस दलात पुन्हा एकदा त्यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉ. वैशाली कडुकर यांची पुणे येथे बदली झाली आहे.
सुरज गुरव यांनी कराड येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून २०१९ साली पदभार घेतला होता. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात कठोर भूमिका घेत अवैध धंदे, गुन्हेगारी कारवाई आणि कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या प्रवृत्तींवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, कराडमधील त्यांचा कार्यकाळ वर्षभराच्या आतच संपुष्टात आला आणि त्यांची नागपूर येथे बदली झाली. या बदली विरोधात कराडकर रस्त्यावर उतरले होते.
सुरज गुरव कोल्हापूरात असताना महानगरपालिकेच्या प्रकरणात कणखर भूमिका घेतल्याचा त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. राजकीय दबावापुढे न झुकणारे अधिकारी अशी ओळख त्यांची झाली. त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातही काम केले. नांदेड येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी पोलिस प्रशासनाच्या कामासोबतच सामाजिक आणि ऐतिहासिक उपक्रमांनाही प्रोत्साहन दिले. फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांच्या पुढाकाराने नांदेडमधील ३७ गडकिल्लेदारांसाठी ४ दिवसांचा ऐतिहासिक गडकिल्ले अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.