कोडोली : समर्थनगर ग्रामपंचायतींतर्गत देगाव फाटा येथील ओढ्यात सोडलेले सांडपाणी गटार तुंबल्यामुळे रस्त्यावर वाहत होते. दुर्गंधी व गैरसोयीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या समस्येवर दै. ‘पुढारी’ने प्रसिध्द केलेल्या वृत्तामुळे प्रशासन हडबडून जागे झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवत गटाराच्या कामाला प्रारंभ केला.
समर्थनगर येथील पाच ते सहा कॉलन्यांचे पाणी मोठ्या गटारातून देगावफाटा येथील ओढ्यात सोडले आहे. घनकचरा अडकल्यामुळे हे गटार मागील पाच ते सहा महिन्यांपासून तुंबले आहे. त्यामुळे गटारातील पाणी मुख्य रस्त्यावर वाहत आहे. तसेच रस्त्यासमोरील भंडारी हाईटसच्या प्रांगणातही पाणी साठून राहत आहे. त्यामुळे परिसरात दलदल माजली असून परिसरात दुर्गंधी पसरली होती. ज्या परिसरातून हे सांडपाणी वाहत आहे, तेथून अवघ्या दहा फुटांवर मिठाईची दुकाने, मेडिकल, सुपर मार्केट, हॉस्पिटल व नागरी वस्ती असून याच रस्त्याने देगाव ते सातारा शहर व एमआयडीसीला जाणारी वाहतूक होते. त्यामुळे या परिसरातून ये-जा करणार्या नागरिकांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता.
या परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकार्यांना वेळोवेळी लेखी, तोंडी तक्रार करुनही संबंधितांकडून दुर्लक्ष केले जात होते. दुर्गंधी व दलदलीमुळे रोगराई पसरुन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे याबाबत संबंधित विभागाला त्वरित आदेश करुन सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे जिल्हाधिकार्यांना दिला होता. याबाबतचे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिध्द करताच ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले. तुंबलेल्या गटाराबाबत उपायोजना करण्यासाठी गुरुवारी प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. गंभीर समस्येची त्वरित दखल घेतल्याने हेमंत देशमुख, हणमंतराव पवार, प्रकाश पाटील, हेमंत शिंदे, अनिल कदम, विद्या पाटील, सतीश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
आ. महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून काम मार्गी
देगाव फाट्यावरील रस्त्यावर येणार्या सांडपाण्याचा प्रश्न आ. महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागल्याचा दावा करण्यात आला आहे. जेसीबीच्या सहाय्याने हे काम ग्रामपंचायत प्रशासनामार्फत हाती घेण्यात आले. समर्थनगर ग्रामपंचायत हद्दीतील देगाव फाटा येथे गटाराचे पाणी रस्त्यावर येत होते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारीही केल्या होत्या. मात्र या सांडपाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यासाठी आ. महेश शिंदे यांनी कायमचा तोडगा काढला. तसेच गटाराचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच संगीता माने, विद्या हिरेमठ, सुप्रीया मोरे, संजय भोसले यांच्यासह ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता.