File Photo
सातारा

Satara Temperature | सूर्यदेव कोपले; तापमानाची वाटचाल उच्चांकाकडे

दररोज वाढणार्‍या उकाड्यामुळे लोकांच्या उडाल्या झोपा; सातारकर निघाले भाजून

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. एप्रिल महिन्यात सातार्‍याचे सरासरी तापमान हे 40 अंशांच्या वर राहिले असून शनिवारीही 40.5 अंशांवर पारा स्थिर होता. जिल्ह्यावर सूर्यदेव कोपले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पारा चाळिशीत असताना आता आणखी उच्चांकी तापमानाकडे वाटचाल सुरू आहे. एप्रिलमध्ये ही तर्‍हा तर मे महिन्यात काय अवस्था होईल, अशी चिंता तापमानामुळे भाजून निघालेले सातारकर बोलून दाखवू लागले आहेत.

तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने अंगाची अक्षरश: लाही-लाही होत आहे. घर, ऑफिस, दुकानांमध्ये पंखे, कुलर, एसीचा वापर वाढलेला आहे. दिवसा घराचा स्लॅब तापल्याने रात्रीच्यावेळी झोपताना तगमग होत असून उकाड्यामुळे लोकांच्या झोपा उडाल्या आहेत. महिनाभरापासून जिल्ह्याचे तापमान भयानक वाढले आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही तापमानाच्या झळा वाढू लागल्या आहेत. कामानिमित्त घराबाहेर पडणारे लोक अक्षरश: भाजून निघत आहेत. सकाळी नऊपासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत. हवामानात झालेल्या बदलामुळे उन्हाची तीव्रता वाढल्याने त्याच लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.

एप्रिलपेक्षा मे महिन्यात तापमानाचा पारा आणखी वाढत असतो. आता मे महिन्यात काय सोसावे लागेल? अशी चिंता नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील तापमानाचा मागील काही वर्षांचा आढावा घेतल्यास सातारा जिल्ह्यामध्ये 2 मे 2001 मध्ये सर्वाधिक 42.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. तर 30 एप्रिल 2013 मध्ये 42.4 अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. यंदा अजून तरी पारा 41 अंशाच्या खाली असल्याचे पहायला मिळते. मात्र, मे महिन्यात हा पारा उच्चांकी तापमानाकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, हवामान विभागाने यंदा महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये चांगल्या मोसमी पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने एवढाच काय तो दिलासा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT