सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर न करताच गाळप हंगाम सुरू केल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ऊसदराचा कोल्हापूर पॅटर्न लागू करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात ऊस वाहतूक रोखण्याचे आंदोलन तीव्र केले आहे. जरंडेश्वर कारखान्याच्या प्रवेशद्वाराबाहेर संघटनेचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले असून, गावोगावी ऊस वाहतूक रोखली जात आहे. त्यामुळे कारखानदारांची कोंडी झाली आहे.
या आंदोलनाला रयत शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, शेतकरी संघटना रघुनाथदादा पाटील गट यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मतभेद बाजूला ठेवून सर्व संघटना ऊसदराच्या प्रश्नावर एकत्र आल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. पुणे-बंगळूर महामार्गावर तीन दिवस चक्काजाम झाल्यानंतर कारखानदारांनी बैठक घेऊन ऊसदराचा निर्णय घेण्याचे आणि कोल्हापूर पॅटर्न लागू करण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र, १३ दिवस उलटूनही कोणतीही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे संघटनांनी आता थेट ऊस वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला आहे. घरातून भाजी भाकरी घेऊनच आंदोलक आंदोलनात सहभागी झाले आहेत.
जरंडेश्वर कारखान्याबाहेर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले असून, कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक ठिकठिकाणी अडवली आहे. शिवथर, पाटखळ, मालगाव आदी गावांमध्ये ऊस वाहतूक बंद करण्याचा ठराव ग्रामस्थांनी घेतला आहे. साखरवाडी, जरंडेश्वर, किसनवीर, शरयू आणि अजिंक्यतारा या कारखान्यांकडे जाणाऱ्या ऊस वाहतुकीलाही आंदोलनाची झळ बसली आहे. शिवथर, हिंगणी, पाली, नागठाणे, तासगाव, गोजेगाव, मसूर तसेच कारखान्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील विविध ठिकाणी उसाची वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली आहेत. कार्यकर्त्यांकडून ऊस वाहने कारखान्यांकडे नेण्यास विरोध होत आहे. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईचा इशारा दिला असला, तरी वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेत उसाची वाहने बाजूला उभी केली जात आहेत. तसेच कारखान्यांना पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे.
तोपर्यंत आंदोलन मागे नाही
ऊस वाहतूक रोखण्याच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ऊसदराचा कोल्हापूर पॅटर्न लागू होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार संघटनांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करण्याची वेळ पुन्हा शेतकऱ्यांवर येऊ देऊ नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे.