तासवडे टोलनाका : मंगळवारी सकाळी सुरू झालेल्या ऊस दर आंदोलनाचा मोठा फटका पुणे -बेंगलोर महामार्गावरील तासवडे येथील टोल नाक्याला बसला आहे. तासवडे टोल नाक्यावर रोज लाखो रुपयांचा टोल गोळा होतो. परंतु गेल्या दोन दिवसापासून ऊस शेतकऱ्यांनी महामार्ग अडवल्यामुळे महामार्गावरून धावणारी वाहने जागेवरच उभी आहेत. त्यामुळे तासवडे टोलनाक्यावर लाखो रूपयांचा टोल बुडाला आहे.
माजी खा. राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील नागठाणे व कोल्हापूर जिल्ह्यातील किणी वाठार या ठिकाणी पुणे -बेंगलोर महामार्ग रोखून धरण्यात आला आहे. ऊसाला दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी गेल्या दोन दिवसापासून महामार्गावर ठिय्या मारला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याची वाहतूक करणारी सर्वच वाहने जागेवर उभी आहेत. तसेच अनेक वाहने पर्यायी मार्गाचा वापर करून प्रवास करत आहेत. परंतु त्यांनाही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान चार दिवसांवर दिवाळीचा सण आला आहे. त्यामुळे पुणे -मुंबई येथील चाकरमानी आपल्या गावाकडे येऊ लागले आहेत. परंतु महामार्ग बंद असल्यामुळे त्यांची मोठी कोंडी झाली आहे. तसेच मंगळवार पासून अनेक शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे अनेक जण गावी जाण्यासाठी बाहेर पडले आहेत. परंतु त्यांनाही महामार्ग बंदचा मोठा फटका बसला आहे.
दरम्यान कराड तालुक्यातील तासवडे या ठिकाणी टोलनाका आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांचा रोज लाखो रुपयांचा टोल गोळा होतो. परंतु गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे . त्यामुळे रोज लाखो रुपयांचा गोळा होणारा टोल गेल्या दोन दिवसापासून पूर्णपणे थांबला आहे. यामुळे टोलनाका व्यवस्थापनाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर ऊस दराची कोंडी फुटावी आणि पुणे बेंगलोर महामार्गावरील सर्वच वाहतूक सुरळीत व्हावी. अशी मागणी वाहन चालक करत आहेत.