Sugarcane Farmers Protest 
सातारा

Sugarcane Farmers Protest : महामार्ग पुन्हा ठप्प; मुख्य रस्तेही ब्लाॅक

दिवाळीच्या तोंडावर जनता रस्त्यावरच अडकल्याने प्रचंड त्रास

पुढारी वृत्तसेवा

सातारा : ऊस दरावरून पेटलेल्या आंदोलनाने पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक सलग ४८ तासांहून अधिक काळ ठप्प आहे. महामार्गानंतर आता वाहतूक कोंडीचे लोन जिल्हाभर व्यापले आहे. मुख्य रस्तेही ब्लाॅक झाले असून ऐन दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यातील जनता रस्त्यावर अडकून पडली आहे. आंदोलनाची कोंडी काही केल्या फुटत नसल्याने ट्रकचालक, प्रवासी व सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत.

तीन दिवसांपासून महामार्गावर अडकलेल्या वाहनचालकांच्या संयमाचा बांध फुटू लागला असून, पोटात अन्नाचा कण नाही, खिशातील पैसे संपत आले. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळत चालली आहे. शेतकऱ्यांच्या उसाला ४५०० रुपये प्रति टन दर मिळावा, या मागणीसाठी नागठाणे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीन दिवसांपासून चक्‍का जाम आंदोलन सुरू असताना दराचा निर्णय झाल्‍याशिवाय रस्‍त्‍यावरून न हटण्‍याच्‍या भूमिकेवर संघटना ठाम राहिल्याने गुरुवारीही महामार्ग ठप्पच राहिला.

खिंडवाडीपासून लिंबखिंडीपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जागा मिळेल तेथे ट्रक, टँकर, टेम्पो आणि खासगी वाहने उभी राहिली आहेत. आंदोलन आणखी ताणले गेल्‍यास लिंबखिंडीच्या पुढे टोल नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वाहतूक सुरळीत होण्याची चिन्हे दिसत नसल्याने चालकांमधील अस्वस्थता वाढत आहे. दिवाळीसाठी गावी निघालेले चाकरमानीही या कोंडीत अडकले आहेत. कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना महामार्गावरच तासन्‌तास थांबावे लागत आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठांचे हाल होत आहेत.

बसमधील प्रवाशांपासून छोट्या चारचाकी वाहनांतील कुटुंबांपर्यंत प्रत्येकाला या कोंडीचा फटका बसत आहे. रहिमतपूर-सातारा मार्गावर अजंठा चौकातून कराडकडून येणारी वाहतूक सेवा रस्‍त्‍याने वळवल्‍याने शहरात येणाऱ्या मार्गिकेवर कोंडी झालेली आहे. सातारा शहरात ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना या कोंडीला सामोरे जावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT