सातारा : जिल्ह्यात ऊस दराचा प्रश्न पुन्हा पेटला असून, प्रतिटन ४,२०० रुपये दर मिळण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन ३,८०० रुपये दर द्यावा, असे परिपत्रक काढल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. याचे पडसाद रविवारी सातारा, कोरेगाव व कराड तालुक्यांत पुन्हा उमटले. कराड तालुक्यातील शिरवडे फाटा येथे संतप्त शेतकऱ्यांनी या परिपत्रकाची होळी केली. पाटण तालुक्यातील नवारस्ता येथे रास्ता रोको झाले. तर सातारा तालुक्यातील शिवथर येथे शेतकऱ्यांनी ऊसतोड बंद पाडत ऊस वाहतूकही रोखली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रतिटन ४,२०० रुपये दर देण्याची हमी दिली होती. कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनीही दर द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील कारखानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करून प्रतिटन ३,८०० रुपये दर दिला जाणार असल्याचे परिपत्रक काढण्यास लावल्याचा आरोप संघटनांनी केला.
कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखाना परिसरातील शिरवडे फाटा येथे रविवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकाची होळी केली. पंचायत समिती सदस्य संग्राम पवार यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. पाटण तालुक्यातील विजापूर-गुहागर महामार्गावरील नवारस्ता परिसरात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको केले.