Sugarcane Pudhari
सातारा

Satara Sugarcane Price : जिल्ह्यात उसासाठी प्रतिटन ३,९०० रुपये दर

जिल्हाधिकार्‍यांच्‍या बैठकीत निर्णय : केंद्राच्या ७०:३० सूत्रानुसारचा आधार

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी उसाला ३ हजार ९०० प्रतिटन दर देण्यास सहमती दर्शवली आहे. साखरेच्या दरातील चढ-उतार विचारात घेऊन आरएसएफच्या ७०:३० सूत्रानुसार अंतिम दर निश्‍चित करण्याबबात चर्चा झाली. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतलेल्या बैठकीनंतर जिल्ह्यातील जवळपास सर्व कारखान्यांनी दर जाहीर केले.

उसाची पहिली उचल ४ हजार ५०० रुपये द्यावी या मागणीसाठी आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनांनी रास्ता रोको सुरूच ठेवले. संघटना आणि कारखानदार यांच्यात अनेक दिवसांपासून संषर्घ सुरू होता. दरावर तोडगा निघावा यासाठी जिल्हा प्रशासन, शेतकरी संघटना आणि कारखान्यांचे संचालक यांच्यात अनेक बैठका झाल्या. मात्र, मागणीवर एकमत होत नसल्याने दोन्ही बाजूंनी समाधानकारक तोडगा निघत नव्हता. त्यामुळे शेतकरी संघटनेचे आंदोलन चिघळले होते. दरावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी बैठक झाली. यावेळी संघटना तसेच कारखानदार यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.

साखरेच्या दरातील चढ-उतार विचारात घेऊन आरएसएफच्या ७०:३० सूत्रानुसार अंतिम दर निश्‍चित करण्याबबात चर्चा झाली. इतर साखर कारखान्यांनीही जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या तुलनेत दरातील तफावत न ठेवता जादा दर द्यावा, अशी भूमिका संघटनांनी मांडली. मात्र संघटनांनी केवळ बैठकीतील आश्वासनांतर समाधान मानण्यास नकार दिला. जाहीर केलेल्या दराची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी केली. ऊस वजनातील काटामारी रोखण्यासाठी मूल्यनिर्धारण समितीच्या पॅनलमध्ये संघटनांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्याचा मुद्दा उपस्थित केला. सर्व कारखान्यांनी आपापले ऊसदर तातडीने जाहीर करावेत, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यानंतर बहुतांश कारखान्यांनी दराची पहिली उचल ३ हजार ९०० रुपये इतकी जाहीर केली आहे.

असे आहेत कारखान्यांचे उसाचे प्रतिटन दर

जिल्ह्यातील कारखान्यांनी प्रतिटन उसाचा पहिला हप्ता जाहीर केला. त्यामध्ये अजिंक्यतारा, सह्याद्री, जरंडेश्वर, रयत, जयवंत, शिवनेरी या साखर कारखान्‍यांनी पहिला हप्ता ३ हजार ९०० रुपये, श्रीराम, प्रतापगड, खटाव-माण ३ हजार ८००, स्वराज्य ३ हजार ८०५, लोकनेते बाळासाहेब देसाई व किसन वीरने प्रत्येकी ३ हजार ६०० रुपये असा जाहीर केला. तर शरयू व दत्त इंडियाने सर्वोच्च ३ हजार ९१० रुपये दर जाहीर केला असल्याची माहिती शेतकरी संघटनांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT