कराड : सातारा जिल्ह्यात यंदाच्या ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असली, तरी काही साखर कारखानदारांकडून अद्याप ऊसदराची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. कारखान्यांची धुराडी पेटू लागली असताना उसाच्या पहिल्या हप्त्याचा दर किती मिळणार, याबाबत मात्र अनिश्चितता कायम आहे. परिणामी, जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांनी गाळप हंगामाची तयारी पूर्ण करून प्रत्यक्ष गाळप सुरू केले आहे. मात्र, ऊस वाहतूक आणि गाळप सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांना मिळणारा दर जाहीर करणे अपेक्षित असताना कारखानदारांकडून याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे.
ऊस उत्पादनासाठी लागणारा वाढता खर्च, मजुरी, खते, औषधे, मशागत, तोडणी आणि वाहतुकीचे वाढलेले दर विचारात घेता शेतकऱ्यांना रास्त ऊसदर मिळणे आवश्यक आहे. साखरेच्या बाजारभावाबरोबरच इथेनॉल, बगॅस आणि अन्य उपपदार्थांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून कारखान्यांनी ऊसदर निश्चित करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांचे लक्ष आता पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे.
कारखान्यांची धुराडी पेटली, गाळप सुरू झाले; मात्र शेतकऱ्यांच्या घामाचा मोबदला ठरवणारा ऊसदर अद्याप काही साखर कारखान्यांनी जाहीर केलेला नसल्याने जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा कधी सुटणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.