सातारा

Satara Farmers Protest : कोंडी हटली, वाहने सुसाट सुटली

रात्री दीड वाजता फोन आला अन्‌ नागठाणेत जल्लोष झाला

पुढारी वृत्तसेवा

नागठाणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काच्या दरासाठी पेटलेला संघर्ष अखेर यशस्वी झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळूर महामार्गावर तब्बल ६१ तासांच्या झालेल्या आंदोलनापुढे शासन आणि साखर कारखानदारांना नमते घ्यावे लागले. मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास राजू शेट्टी यांचा आंदोलन स्थगित केल्याचा सांगावा आला अन् नागठाणेच्या महामार्गावर आंदोलक शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला. त्यामुळे महामार्गावरील कोंडी हटली व वाहने अक्षरश: सुसाट सुटली.

शेतकऱ्यांची ४,२०० रुपयांची मागणी मान्य झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले. तडजोडीनुसार, साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांना एकरकमी ३,९०० रुपये दिले जाणार आहेत. कारखाना बंद होताना आणखी १०० रुपये, तर पुढील गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी उर्वरित २०० रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. त्यामुळे एकूण ४,२०० रुपयांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर नागठाणे येथे सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती घेत राजू शेट्टी यांनी रात्री दीडच्या सुमारास आंदोलकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

कारखानदारांनी मागणी मान्य केल्याने उपोषण थांबवून आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने हा लढा यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांत ऊस दरासाठी एकच पॅटर्न राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलन स्थगित झाल्याची बातमी समजताच नागठाणे येथील शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गुलालाची उधळण करत 'स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मात्र, विजयाचा आनंद साजरा करतानाच कार्यकर्त्यांनी शिस्तीचे दर्शन घडवले.

महामार्गावरील मंडप हटवून वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने बाजूला करण्यात आली. रात्री दोनच्या सुमारास महामार्गावरील अडथळे पूर्णपणे दूर करून वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्यात आला. पोलिस आणि आंदोलकांनी अडकलेल्या ट्रकचालकांना आंदोलन स्थगित झाल्याची माहिती देत आपापल्या मार्गाने जाण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT