सातारा

Satara : साखर कारखानदारांकडून दराच्या घोषणेला ‘खो’

शेतकरी संघटना आक्रमक; नवारस्त्यावर १५ नोव्हेंबरला चक्काजाम आंदोलनाचा एल्गार

पुढारी वृत्तसेवा

मारुल हवेली : सातारा जिल्ह्यातील, विशेषतः पाटण तालुक्यातील साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामाचा ऊसदर अद्याप जाहीर न केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

ऊसदर जाहीर करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समन्वय बैठकीत कारखानदारांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदत संपूनही कारखानदारांकडून दराची घोषणा न झाल्याने शेतकरी संघटनांनी रविवार दि. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता नवारस्ता येथे कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे.

बळीराजा शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना तसेच इतर शेतकरी संघटनांच्या वतीने ऊसदराचा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. यापूर्वी नवारस्ता येथे आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दि. ८ नोव्हेंबर रोजीचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि साखर कारखानदारांची समन्वय बैठक झाली. या बैठकीत कारखानदारांना दोन दिवसांत ऊसदर जाहीर करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदतीनंतरही कोणत्याही कारखान्याने दर जाहीर न केल्याने संघटनांनी पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

शेतकरी वर्षभर कष्ट करून ऊस पिकवतो. बियाणे, खते, औषधे, मजुरी, वाहतूक आणि मशागतीचा वाढता खर्च सहन करून ऊस उत्पादन घेतो. मात्र, हंगाम सुरू होण्याची वेळ आली तरी आपल्या उसाला नेमका किती दर मिळणार, याबाबत स्पष्टता नसते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होतो. दरम्यान, ऊसदराच्या प्रश्नाबरोबरच शेतकऱ्यांच्या इतर प्रलंबित प्रश्नांनाही संघटनांनी आंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा इशारा दिला आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीबाबत शासनाने वित्तीय संस्थांना दिलासा देण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन केले जात असताना जलसंपदा विभागाकडून थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे पाटण तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी केला आहे.

आंदोलनात सर्व ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखान्यांचे सभासद, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी हितचिंतकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पाटण येथे बैठक झाली, यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, शेतकरी संघटनेचे पाटण तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्हा युवकाध्यक्ष विकास कदम, शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तात्या पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम साळुंखे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे कराड तालुका उपाध्यक्ष विशाल पुस्तके, शेतकरी संघटनेचे पाटण तालुका उपाध्यक्ष काशिनाथ शिर्के यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT