सातारा

Satara News : बैठक निष्फळ; संघटना आंदोलनावर ठाम

साखर कारखान्यांनी २ दिवसांत दर जाहीर करावे : मंत्री शंभूराज देसाई

पुढारी वृत्तसेवा

सातारा : साखर कारखानदार व शेतकरी संघटनांची ऊस दरप्रश्नी गुरुवारी झालेली बैठकही निष्पळ ठरली. स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम राहिली असून, हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी साखरेचा एमएसपी दर वाढला तरच उसाचा दर वाढू शकतो. एमएसपी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या हातात असून त्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे सांगितले. कारखान्यांनी दोन दिवसांत दर जाहीर करावेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार व संघटनांची ऊस दरप्रश्नी बैठक झाली. यावेळी ना. देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खा. नितीन पाटील, आ. धैर्यशील कदम, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख निखिल पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील आदी उपस्थित होते. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनीही भूमिका मांडली. सरकारी निर्देशानुसार कारखान्यांचे कामकाज होत नाही. ऊस दर जाहीर केल्यावर कारखाने सुरू होणे आवश्यक आहे. साखर दर वाढल्याने उसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपये पहिला हप्ता व ५०० रुपये दुसरी उचल मिळायला हवी. काटमारी करून शेतकर्‍यांच्या उसावर दरोडा टाकला जात आहे.

उसाला एकरी ६० हजारांहून अधिक उत्पादन खर्च येत आहे. हक्कासाठी शेतकरी रस्त्यावर उतरला असताना त्याची दखल घेतली जात नाही. दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असून उसाला चांगला दर द्यावा. कर्नाटक, गुजरातप्रमाणे ऊस दर का देत नाही? असा सवाल संघटनांनी केला. त्यावर ना. भोसले म्हणाले, कारखान्यांचा व्यवस्थापनावर होणारा खर्च, बँकांकडील कर्ज याचा विचार करून ऊस दराची पहिली उचल दिली जाते. ऊस दरासाठी आंदोलन करावे अशी कुणाचीही इच्छा नाही. हंगाम सुरू होण्यासाठी काहीतरी सांगून वेळ मारून नेण्याचा प्रकार होऊ नये. देशात कुठल्याही कारखान्याने ८० रुपये किलो दराने साखर विकलेली नाही. साखर कारखाने कुठेही नफा राखून ठेवत नाहीत. झालेला नफा शेतकर्‍यांमध्ये वाटून टाकला जातो.

उशिरा बैठकीमुळे शेतकरी संघटनांचा ठिय्या

बैठक नियोजित निर्धारित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाल्याने नाराज झालेल्या शेतकरी संघटनांनी नियोजन भवनातून वॉकाऊट केले. घोषणाबाजी करत नियोजन भवनासमोर ठिय्या मांडला. शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींची क्रूर चेष्टा केली जात असल्याचा आरोप करत संघटनांनी संताप व्यक्त केला. प्रशासनाने समजूत काढल्यावर संघटनांचे प्रतिनिधी नियोजन भवनात बैठकीस गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT