Satara Crime: सातारच्या उपनगरात कॅफेंकडून ‘मिनी लॉजिंग’   (File Photo)
सातारा

Satara Crime: सातारच्या उपनगरात कॅफेंकडून ‘मिनी लॉजिंग’

अल्पवयीन मुला-मुलींच्या भविष्याशी खेळ; कारवाईची गरज

पुढारी वृत्तसेवा

अजय कदम

खेड : सातारा शहरच्या खेड, कृष्णानगर आदी उपनगरात कॅफेच्या नावाखाली सुरू असलेला धंदा आता ‘मिनी लॉजिंग’ पर्याय बनला आहे. भावी पिढीच्या भविष्यासाठी ही चिंताजनक बाब ठरत आहे. पोलिसांना सर्व माहिती असूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील बसस्थानक, चौक, महाविद्यालय परिसर अशा ठिकाणी तब्बल 25 ते 30 कॅफेंचा धिंगाणा सुरू असताना आता हे फॅड उपनगरांमध्ये दिसू लागले आहे.

आकर्षक नावांच्या आड दडलेली उपनगरातील काही ठिकाणे प्रामुख्याने शाळा व महाविद्यालयीन युवक-युवतींना लक्ष्य करतात. आतमध्ये उभारलेले उंच कंपार्टमेंट, अंधूक प्रकाश यामुळे काय चालते हे बाहेरून समजणे अशक्य होते.

पोलिसांकडे संपूर्ण माहिती असूनही केवळ किरकोळ कारवाईवरच समाधान मानले जाते. या कारवायांमागील ‘गणित’ आणि ‘मंथली पोच’ची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घेणे आवश्यक आहे, असे नागरिकांचे मत आहे. ठोस मोहिमेअभावी अल्पवयीन मुला-मुलींचे आयुष्य धोक्यात येत आहे. कॅफेत प्रवेशासाठी नाव, वय याची कोणतीही नोंद घेतली जात नाही. त्यामुळे अल्पवयीन मुलीही या जाळ्यात अडकताना दिसतात. भविष्यात त्यांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यासाठी पोलिसांची करडी नजर, अचानक छापे आणि अल्पवयीन मुलांचे समुपदेशन अत्यावश्यक ठरत आहे.

मैत्री करणे हा गुन्हा नाही; पण तो खुल्या वातावरणात व्हावा, अशीच जनतेची अपेक्षा आहे. बंदिस्त व अंधार्‍या खोलीत सुरू असलेल्या या बेकायदा कृत्यांवर आळा घालणे हेच सध्या मोठे आव्हान ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT