सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभा होतात. यापूर्वी या सभांची माहिती सार्वजनिक केली जात होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून झेडपीचा कारभार म्हणजे आळी मिळी गूपचिळी असाच झाला आहे. अधिकारी आणि सदस्यांमध्येच कारभार होत असल्याने नेमके झेडपीत काय चालले आहे? हेच समजेनासे झाले आहे. यामुळे प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर शंका येवू लागली आहे. तर लोकप्रतिनिधी पारदर्शक कारभार करण्यास टाळाटाळ करत आहेत का? असाही सवाल केला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्थायी, कृषी व पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण , समाजकल्याण, बांधकाम व आरोग्य, शिक्षण व अर्थ यासह विविध विषय समित्यांच्या सभा दर महिन्याला होत असतात. या विषय समित्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामे, योजनांची अंमलबजावणी, निधीचा वापर, प्रशासकीय निर्णयावर समित्यांचे सभापती व सदस्य चर्चा करत असतात. या समित्यांचे कामकाज ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाते. मात्र, या विषय समित्यांच्या सभा कधी होतात? कोणते विषय चर्चेला घेतले जातात? कोणत्या कामांना मंजूरी दिली जाते? कोणते निर्णय घेतले जातात? याची माहिती सार्वजनिक पातळीवर सहज उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
विषय समित्यांच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात असतात. मात्र त्याची माहिती उपलब्ध होत नसल्याने प्रशासनाचा सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. विषय समिती सभांचे वेळापत्रक, बैठकीचा कार्यवृत्तांत, मंजूर ठराव आणि निर्णयांची माहिती नागरिकांना समजली पाहिजे. तरच झेडपीचा पारदर्शक कारभार समोर येणार आहे. अनेकदा विषय समित्यांच्या सभा कधी होतात हे सदस्यांनाच समजत नाहीत. सदस्यही अनभिज्ञ राहत असतात. त्यासाठी सर्वच विभागांनी सभाबाबत अलर्ट राहणे आवश्यक आहे. या सभामध्ये अनेक खलबते होत असतात. मात्र, सभेतील काहीच कार्यवृत्तांत समोर येत नसल्याने आतापर्यंत झालेल्या सभा गुपचूप झाल्या की काय? अशी चर्चा झेडपी वर्तुळात आहे. त्या त्या विभागातील कारभारावर अनेकदा सदस्य व सभापतींनी नाराजी दर्शवत वाभाडे काढले आहेत. त्यामुळेच प्रशासन गुपचूप बैठकावर भर देत असल्याचे चित्र झेडपीत सध्या पहावयास मिळत आहे.