सातारा

सातारा : पावसाळी कामात हयगय करणार्‍यांवर कठोर कारवाई

backup backup

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यातील मान्सूनपूर्व उपाययोजनांचा फज्जा उडाल्याबाबत दै.'पुढारी'ने झोड उठवल्यानंतर प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. पावसाळा पूर्व उपाययोजनांची कामे करत असताना अधिकारी, कर्मचारी हातचा राखून काम करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा बडगा पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत बापट यांनी उगारला आहे. कामांचे खोटे अहवाल दिले असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे बापट यांनी म्हटले आहे.

पावसाळा तोंडावर आला असल्यामुळे 'पुढारी'ने सातारकरांना भेडसावणार्‍या समस्यांचा उहापोह केला होता. पावसाळ्यात सातारकरांना भेडसावणार्‍या अडचणींबाबत 'पुढारी'ने शनिवारच्या अंकात 'तर्‍हा सातार्‍याची; तुंबलेल्या, वासाडलेल्या गटारांची' असे वृत्त फोटोसह प्रसिद्ध केले होते. त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. तातडीने कार्यवाहीही सुरू केली. यासंदर्भात प्रशासक अभिजीत बापट यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना कडक शब्दात सूचना दिल्या आहेत.

त्यांनी यासंदर्भातील पत्रकात म्हटले आहे, सातारा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात सध्या राज्य संवर्गातील तीन आरोग्य निरिक्षक कार्यरत आहेत. सुमारे आठवडयापूर्वीच मान्सुनपूर्व कामांची सुरुवात करण्यात आली आहे. शाहुनगर भागातील मुख्य तीन ओढे, गोडोली तळे येथील अतिसंवेदशील ओढा, देवी कॉलनी ते माने हॉस्पिटलकडे जाणार ओढा, शाहूपुरीमधील तत्कालीन प्रभाग 1, 2 व 3 मधील ओढे, महादरे येथील ओढा, सातारा शहरातील प्रभाग 18,19, 20 येथील पश्चिमेकडील ओढे आणि प्रभाग क्रमांक 1,2,3, 4 आणि 5 यामधील ओढयांची स्वच्छता, साफसफाई आजअखेर करण्यात आलेली आहेत. ज्या ठिकाणी जेसीबी यंत्रणा पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणच्या ओढयांची स्वच्छता करण्यासाठी मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या शिफारशीने मजूर संस्था नेमून साफसफाई करण्याची यंत्रणा कार्यरत आहे. काही काळातच उर्वरित भागाची स्वच्छता करण्याचे नियोजन आहे. आपत्कालिन सेवेसाठी 20 कर्मचा-यांचे आरोग्य विभागाचे पथक आणि अन्य विभागांच्या समन्वयाव्दारे आपत्ती निवारण पथके तयार केली आहेत.

सातारकरांना पावसाळ्यात कोणताही त्रास होवू नये यासाठी जाणिवपूर्वक लक्ष दिले आहे. त्यामुळेच 'पुढारी'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेण्यात आली आहे. ज्या काही त्रुटी असतील त्या दूर केल्या जातील. कर्मचारी अथवा ठेकेदार यांची कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही, असे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत बापट यांनी म्हटले आहे.

खोटा रिपोर्ट देणार्‍यावर कारवाई करणार

सातारा नगरपरिषदेच्या प्रशासनाच्या वतीने पावसाळा पूर्व कामांचे नियोजन आणि त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. तथापि मान्सून समस्यांचा सातारकरांना सामना करावा लागणार नाही याची पुरेपूर दक्षता प्रशासक म्हणून घेण्यात आली आहे. खोटे अहवाल दिले गेले असतील किंवा जाणिवपूर्वक प्रशासनाची कोंडी करण्यासाठी कोणी अधिकारी किंवा कर्मचारी कामामध्ये हातचा राखून काम करत असेल तर अशांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा बापट यांनी दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT