पाचगणी : पर्यटननगरी असलेल्या पाचगणीचा मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अंधारात गेला आहे. लाखो रुपये खर्च करून बसवलेले पथदिवे बंद पडल्याने नागरिक व पर्यटकांना रात्रीच्या वेळी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पथदिव्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
शहराच्या मध्यवर्ती मार्गावर पर्यटकांची आणि स्थानिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, काही पथदिवे काम करत नसल्यामुळे वाहनचालक व पादचार्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः शाळा, हॉटेल्स आणि रुग्णालय मुख्य रस्ता परिसरात ही अंधाराची समस्या अधिक तीव्र आहे. पाचगणी शहरातील बसस्थानका पासून संजीवनी नाका ते नारायय लॉज या मुख्य रस्त्यावर पथ दिव्याची दूरवस्था पहायला मिळत आहे. या मार्गावरील पथदिवे काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिक, पर्यटक व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पथदिव्यांची देखभाल व वेळोवेळी तपासणी करणे ही नगरपालिकेची जबाबदारी असताना देखील प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शहरातील काही खांबांवर दिवेच नाहीत, काही ठिकाणी तर दिवे लटकताना दिसत आहेत. काही ठिकाणी वायरिंग उघडी पडली आहे, काही ठिकाणी दिवेच दिसत नाहीत तर नुसते खांब उभे असल्याने चित्र पहायला मिळत आहे. संजीवन नाका येथे खांब पडला आहे या अनेक कारणाने पथदिवे चालू नाहीत. प्रकाश नसल्याने पावसाळी दिवसामध्ये अनेक ठिकाणी दुचाकिंचा अपघात होत आहेत. परिणामी, स्ट्रीट लाईट कागदावर सुरू असून रात्रीच्या वेळेस बंद ’ अशी अवस्था झाली आहे.
शहरातील मुख्य मार्गावरील पथदिवे बंद असल्याने अंधारातच शहरातील लोकांना खड्ड्यातून मार्ग काढत जावे लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील पथदिवे कधी चालू कधी बंद असल्यामुळे, छोटे-मोठे अपघात वारंवार घडत आहे. रात्रीच्या वेळेस फुटपाथ वरून चालणेही मुश्किल झाले आहे. पर्यटनस्थळाच्या विकासासाठी विविध नवनवीन उपक्रम हाती घेतले जातात. सुशोभीकरणासाठी करण्यात येणार्या कामांचे स्वागतच आहे; मात्र प्रशासनाने लाखो रुपये खर्चून केलेल्या या कामांकडे तसेच त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणे ही खेदजनक बाब आहे. स्थानिकांनी व व्यापार्यांनी प्रशासनाकडे तातडीने सर्व पथदिवे दुरुस्त करून रस्त्यावर प्रकाश व्यवस्था पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.