ST NCMC Card  
सातारा

ST NCMC Card : एसटीच्या एनसीएमसी कार्डचा पुरता बोजवारा

महामंडळाचा भोंगळ कारभार : ज्येष्ठ नागरिक व महिलांना फुल तिकिटांचा भुर्दंड

पुढारी वृत्तसेवा

सातारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात डिजिटल तिकीट व्यवस्थेसाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी कार्डव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र समोर येत आहे. कार्ड असूनही सवलतीचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारींमुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. एसटीच्या या व्यवस्थेतील त्रुटींमुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, डिजिटल सुविधेच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महिलांसाठी शासनाने जाहीर केलेली तिकीट सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक केले आहे. सवलतीच्या अपेक्षेने प्रवासाला निघालेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना काही वेळा पूर्ण तिकीट काढावे लागत असल्याच्या तक्रारींमुळे नाराजी व्यक्त होत आहे. डिजिटल व्यवस्थेचा प्रवाशांना फटका बसू लागला आहे.

एसटी महामंडळाने तिकीट व्यवहार अधिक सुलभ, पारदर्शक आणि आधुनिक करण्याच्या उद्देशाने डिजिटल प्रणालीचा वापर सुरू केला आहे. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर करताना प्रवाशांना प्रत्यक्षात अडचणींचा सामना करावा लागत आहे. कार्ड काढूनही सवलत मिळत नसेल, तर त्याचा काय उपयोग असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. एनसीएमसी कार्डच्या वापरातील अडचणी नेमक्या कोणत्या आहेत, कार्डधारकांना सवलतीचा लाभ न मिळण्याच्या तक्रारी किती आहेत आणि या समस्येवर कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, याबाबत एसटी प्रशासनाने स्पष्टता देणे आवश्यक आहे. वाहकांना योग्य प्रशिक्षण, तांत्रिक यंत्रणेची नियमित तपासणी आणि प्रवाशांसाठी तक्रार निवारणाची प्रभावी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

विशेषतः अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांना एनसीएमसी कार्ड नोंदणी केल्यानंतर मिळालेली क्यूआर कोडयुक्त पावती वाहकाच्या ईटीएम मशीनवर स्कॅन करून सवलतीचे तिकीट घेता येणार आहे. ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार आहे. मात्र याची ठोस अंमलबजावणी होताना दिसत नाही त्याचा भुर्दंड मात्र सवलतधारक प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT