कराड : नादुरुस्त, गळक्या व खिडक्या नसलेल्या एसटीमधून अनेक वेळेला प्रवाशांच्या जीवाशी एसटी महामंडळ खेळत असते. असाच काहीसा प्रकार शनिवार दि. 7 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. कराडहून विट्याला प्रवासी घेऊन निघालेली एसटी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास सुर्ली घाटाच्या मध्यावरच बंद पडली.
त्यामुळे रात्रीच्या वेळी सुमारे तासभर घाटातच प्रवाशांना ताटकळत थांबावे लागले. त्यामध्ये अनेक महिला प्रवाशांचाही समावेश होता. घाटातच एसटी बंद पडल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. त्यामुळे प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत एसटी महामंडळाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
कराड आगाराची कराड ते विटा ही जादा एसटी शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कराड आगारातील फलाटवर लागली. विट्यापर्यंत जाणारे प्रवासी भरपूर असल्याने एसटी काही वेळातच प्रवाशांनी पूर्ण भरली. त्यानंतर चालक व वाहक एसटी घेऊन विट्याच्या दिशेने मार्गस्थ झाले. विट्याकडे जात असताना मधले प्रवासी काही ठिकाणी उतरले तर काही ठिकाणचे प्रवासी घेऊन एसटी पुन्हा सुर्ली घाटातून जावू लागली. घाटातील मध्यावरील वळणावर एसटी आली असता अचानक बंद पडली. इंजिनला डिझेल पुरवठा करणार्या पाईपने एयर धरली असेल असे समजून बराच वेळ चालक व वाहकाने डिझेल पाईपमधील एयर काढून एसटी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र कितीही खटाटोप केला तरी एसटी सुरू झाली नाही.
दरम्यान प्रवाशांनी एसटी का बंद पडली याची माहिती घेतली असता वाहकाने एयर धरली असावी असे सांगितले तर चालकाने कोणती तरी वायर निसटली असेल असे सांगितले. त्यानंतर वाहकाने रात्रीच्या ड्युटीवर असणारे इन्चार्ज शिंदे यांच्याशी संपर्क साधून सुर्ली घाटात एसटी बंद पडल्याचे सांगितले. त्याच वेळी प्रवाशांनी संबंधित अधिकार्यांशी बोलून एसटी भरलेली असून एसटीमध्ये अनेक महिला प्रवासी असल्याचे जाणीव करून दिली. रात्रीची वेळ आणि घाटामध्ये एसटी बंद पडल्याने आपण त्वरित याबाबत उपाययोजना करावी असे सांगितल्यानंतर संबंधित अधिकार्यांनी धाराशिव एसटी डेपोतून त्वरित सोडली.
तसेच विटा डेपोची दुसरी एसटीही त्याच्या पाठोपाठ असल्याचे सांगितले. दहा मिनिटात दोन्ही एसटी तेथे येतील त्यांना घाटातून प्रवासी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास धाराशिव व विटा एसटीतून सुर्ली घाटामध्ये बंद पडलेल्या एसटीतील प्रवासी पुढे मार्गस्थ झाले. मात्र रात्रीच्या वेळी घाट मार्गावरील रस्त्यावर सुस्थितीतील बस देण्याऐवजी नादुरुस्त बस देऊन एसटी महामंडळ प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याच्या संपप्त प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहेत.
एसटी सुरू होत नाही असे म्हटल्यावर वाहकाने त्वरित कराड आगारातील व्यक्तीशी संपर्क साधून मेकॅनिकलला पाठवून द्या, अन्यथा प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी दुसरी एसटी पाठवा असा निरोप दिला. मात्र त्यानंतरही पंधरा मिनिटे होऊन गेली तरी वाहकाला माघारी निरोप आला नसल्याने त्यांनी पुन्हा आगारात संबंधित व्यक्तीला संपर्क साधला असता त्याने सांगितले आहे असे सांगून फोन ठेवून दिला. आगारातील व्यक्ती टाळाटाळ करत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी संबंधित व्यक्तीला पुन्हा फोन करून विचारणा केली असता मी सांगितले आहे ते काम माझे नाही असे म्हणून संबंधिताने पुन्हा फोन ठेवून दिला. रात्री सव्वानऊ वाजता कराड आगारातील संबंधित व्यक्तीला फोन केला असता त्याने प्रवाशांशी उद्धटपणे बोलून ते काम माझे नाही असे म्हणून जबाबदारी टाळण्याचा प्रकार गंभीर असून वरिष्ठ संबंधितावर काय कारवाई करणार? अशी विचारणा प्रवाशांमधून होत आहे.