सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल 95.71 टक्के लागला. या निकालात जिल्ह्यात उत्तीर्णामध्ये मुलींचा टक्का 97.25 तर मुलांचा 94.31 टक्के असल्याने मुलीच हुशार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र गतवर्षीपेक्षा जिल्ह्याच्या निकालात 1.04 टक्क्यांनी घट झाली. सातारा जिल्ह्याने कोल्हापूर विभागात यावर्षीही द्वितीय क्रमांक पटकावला.
जिल्ह्यात 116 परीक्षा केंद्रांवर 780 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. परीक्षेसाठी 36 हजार 508 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी 36 हजार 412 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. तर 34 हजार 850 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये 18 हजार 9 मुले व 16 हजार 841 मुलींचा समावेश आहे.
मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94.31 टक्के तर मुलींचे 97.25 टक्के आहे. यावर्षी देखील मुलांच्या तुलनेत मुलींचा टक्का जास्त आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल 95.71 टक्के लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी दिली. रिपीटरच्या 720 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 704 विद्यार्थ्यांना परीक्षा दिली. तर 272 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 38.63 टक्के निकाल लागला .
सातारा जिल्ह्यातील 4 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. जावलीतील 984 पैकी 944, कराडमधील 7 हजार 231 पैकी 6 हजार 891, खंडाळामधील 2 हजार 180 पैकी 2 हजार 109, खटावमधील 3 हजार 565 पैकी 3 हजार 415, कोरेगावमधील 2 हजार 661 पैकी 2 हजार 577, माणमधील 2 हजार 964 पैकी 2 हजार 823, महाबळेश्वरमधील 1 हजार 212 पैकी 1 हजार 172, फलटणमधील 3 हजार 996 पैकी 3 हजार 694, पाटणमधील 2 हजार 710 पैकी 2 हजार 555, सातारामधील 6 हजार 523 पैकी 6 हजार 329, वाईमधील 2 हजार 386 पैकी 2 हजार 341 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.