solar energy  pudhari photo
सातारा

Satara Solar Energy : सातारा मंडळातील १२,१६२ सौर ग्राहकांचे वीज बिल शून्य

एका महिन्यात तब्बल ३४ लाख ६२ हजार युनिट सौर ऊर्जेची निर्मिती

पुढारी वृत्तसेवा

सातारा : ‘आत्मनिर्भर कुटुंब, आत्मनिर्भर राष्ट्र’ ही संकल्पना साकारण्यासाठी हरीत ऊर्जेचा अर्थात सौर ऊर्जेचा वापर वाढत आहे. घराच्या छतावर सौर पॅनेल बसवून वीजनिर्मिती करण्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, बारामती परिमंडळातील जुलै महिन्याच्या आकडेवारीनुसार सातारा मंडळातील १२ हजार १६२ सौर ग्राहकांचे वीज बिल शून्य झाले आहे. या ग्राहकांनी एका महिन्यात तब्बल ३४ लाख ६२ हजार युनिट सौर ऊर्जेची निर्मिती केली आहे.

बारामती परिमंडळात सोलापूर मंडळातील २१ हजार १३२ ग्राहकांनी ७२ लाख ११ हजार युनिट, सातारा मंडळातील १२ हजार १६२ ग्राहकांनी ३४ लाख ६२ हजार युनिट, तर बारामती ग्रामीण मंडळातील ६ हजार १०३ ग्राहकांनी १९ लाख ९८ हजार युनिट सौर ऊर्जेची निर्मिती केली. सौर ऊर्जेच्या वापरामुळे ग्राहकांच्या वीज बिलात मोठी बचत होत असून, पर्यावरणपूरक वीजनिर्मितीलाही चालना मिळत आहे. घरगुती ग्राहकांनी केंद्र व राज्य शासनाच्या सौर ऊर्जा योजनांचा लाभ घेऊन घराच्या छतावर सौर यंत्रणा बसवावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. 'स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट)' योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र ग्राहकांच्या घरावर अत्यल्प खर्चात १ किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प बसवण्यात येतो.

या योजनेत दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना २ हजार ५०० रुपये, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अनुसूचित जाती-जमातीच्या ग्राहकांना ५ हजार रुपये, तर सर्वसाधारण ग्राहकांना १० हजार रुपये लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. योजनेसाठी अर्जदार पात्र घरगुती वीज ग्राहक असणे आवश्यक असून, ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत दरमहा १०० युनिट किंवा त्यापेक्षा कमी वीज वापर असणे आवश्यक आहे.

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज खर्चात बचत करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनास हातभार लागत असल्याने सातारा जिल्ह्यातील अधिकाधिक घरगुती ग्राहकांनी या योजनांचा लाभ घ्यावा. यासाठी महावितरणच्या शाखा किंवा उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोलर पॅनेल बसवण्यासाठी दिले जाते अनुदान

केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ अंतर्गतही घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. १ किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, २ किलोवॅटसाठी ६० हजार रुपये, तर ३ किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेसाठी ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे. १ किलोवॅट क्षमतेच्या यंत्रणेसाठी सुमारे १०८ चौरस फूट सावलीविरहित जागा आवश्यक असून, त्यातून दररोज सुमारे ४ ते ५ युनिट वीज निर्मिती होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT