Sant dnyaneshwar maharaj palkhi sohala 
सातारा

Sant dnyaneshwar maharaj palkhi sohala : माऊलींची वारी... शंभू महादेवाच्या दारी

‘हरिनामा’ सोबतच शिंगणापुरात ‘हरहर महादेव’चा गजर

पुढारी वृत्तसेवा

शिखर शिंगणापूर : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ‘ग्यानबा-तुकोबा’च्या जयघोष करत पंढरपूरकडे मार्गस्थ होत असून आज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत आहे. पालखी मार्गालगतच शिखर शिंगणापूर तीर्थक्षेत्र असल्याने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही माऊलींच्या पालखी सोहळ्यातील लाखो वारकरी भाविकांनी शंभू महादेवाच्या दर्शनासाठी शिंगणापुरात गर्दी केली आहे. यानिमित्ताने लाखो वैष्णवांचा मेळा शिंगणापूरनगरीत दाखल झाला असून ‘हरिनामा’ सोबतच ‘हरहर महादेव’चा गजर करत पालखी सोहळ्यातील लाखो भाविकांनी शंभू महादेवाचे दर्शन घेतले.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा रविवारी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ होत आहे. प्रतिवर्षी माऊलींचा पालखी सोहळा फलटण, बरड येथून नातेपुतेकडे मार्गस्थ होत असताना वारीतील लाखो भाविक पालखी मार्गालगत असलेल्या शिंगणापुरात शंभू महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. यावर्षीही गेल्या दोन-तीन दिवसांपासून वारीतील भाविकांनी शिंगणापूरमध्ये गर्दी केली आहे. शुक्रवारपासूनच पालखी सोहळ्यातील लाखो वारकरी फलटण, बरड, नातेपुते मार्गाने शिंगणापूर नगरीत दाखल होत आहेत. शनिवारी माऊलींचा पालखी सोहळा बरड मुक्कामी विसावला असून नजीकच असलेल्या शिखर शिंगणापूरमध्ये शनिवारी सकाळपासूनच शंभू महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. पालखी सोहळ्यामुळे शिंगणापूरमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ‘माऊली माऊली, ग्यानबा-तुकाराम’ सोबतच ‘हरहर महादेव’चा गजर करत लाखो वारकऱ्यांनी शंभू महादेवाचे दर्शन घेतले. शिंगणापूरनगरीमध्ये आलेले वारकरी भजन, कीर्तन, प्रवचनामध्ये तल्लीन झाल्याचे दिसून येत आहे. तर स्थानिकांकडून वारकऱ्यांसाठी अन्‍नदान, महाप्रसाद वाटप करण्यात येत आहे. शंभू महादेवाचे दर्शन घेऊन वारकरी भाविक पुन्हा पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत.

रविवारी सकाळी माऊलींचा पालखी सोहळा बरडमधून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर परिसरातील हजारो भाविक शंभू महादेवाचे दर्शन घेऊन माऊलींच्या दर्शनासाठी नातेपुते-फलटण मार्गावरील शिंगणापूर फाट्यावर माऊलींच्या पालखी सोहळ्याकडे मार्गस्थ होत असतात. शिंगणापूर फाट्यावरून शिंगणापूरकडे येण्या-जाण्यासाठी एसटी महामंडळाने जादा बसेसची सोय केली आहे. तर काही भाविक पायी चालत वारीमध्ये पुन्हा सहभागी होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT