वडूज : खटाव तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागामार्फत राबवण्यात आलेल्या वृक्षलागवड योजनांमध्ये सुमारे ११ कोटी २१ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात वरिष्ठ वन अधिकाऱ्यांसह एकूण २३ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश वडूज येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी वडूज पोलिसांकडून कशा पद्धतीने केली जाते, याकडे तक्रारदारासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सन २०१७ ते २०२३ या कालावधीत राज्यात ३३ कोटी वृक्षलागवड तसेच १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले. खटाव तालुक्यात या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये प्रत्यक्ष वृक्षलागवड न करता कागदोपत्री लागवड दाखवणे, वृक्षांच्या संगोपनासाठी पाणी व खतांचा वापर न करणे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड, गट लागवड व प्लांटेशन न करता बनावट कागदपत्रांच्या आधारे निधीचा गैरवापर केल्याचा आरोप तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी केला आहे. या प्रकरणात कारवाई होत नसल्याने चव्हाण यांनी वडूज येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने संबंधित २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश वडूज पोलिसांना दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशामुळे सामाजिक वनीकरण विभागात खळबळ उडाली असून, या प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, याप्रकरणी अनेक वेळा आंदोलने करून दोषी वन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र, कारवाई न झाल्याने न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आता पोलिस प्रशासनाने निष्पक्ष व पारदर्शक तपास करावा, अन्यथा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी सांगितले.
पोलिसांकडून अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू : पोलिस निरीक्षक सोनवणे
याबाबत वडूजचे पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, सामाजिक वनीकरण विभागाशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात वडूज न्यायालयाने आदेश दिले आहेत. या आदेशाची विहित मुदतीत अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यायालयाचा ‘यांच्यावर’ ठपका...
न्यायालयाच्या आदेशात राज्याचे मुख्य वनसचिव वेणुगोपाल रेड्डी, हनुमंत धुमाळ, रंगनाथ मनिलाल नाईकडे, सातारा विभागीय वन अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे यांच्यासह धर्मवीर साल विठ्ठल, एम. एन. मोहिते, सुनीता सिंग, सुमित विश्वासू, एन. आर. प्रवीण, व. ग. भोसले, शं. वि. बिचुकले, उ. म्हा. पांढरे, बा. रा. सानप, अ. सू. बेसके, यो. पु. गावित, अ. च. शिंदे, एस. एस. कुंभार, नि. द. देशमुख, बा. उ. जगदाळे, वि. श्री. मोरे, प्र. ज्ञा. बुधनवर, कु. के. एच. भोसले आणि अर्जुन पोपट गंभरे यांचा समावेश असल्याचे तक्रारदाराने सांगितले आहे. तक्रारदाराच्या या माहितीला वडूज पोलिसांनीही दुजोरा दिला आहे.