मृत स्‍नेहल सावंत  
सातारा

Satara Crime: कोयत्याच्या घावांनी स्नेहलची झुंज अखेर संपली

पालघरमधील घटनेने साताऱ्यात संताप; संशयित अमोल मुळेला फासावर लटकवण्‍याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुळकोटी (ता. माण) येथील स्नेहल सावंत (वय २७) या युवतीवर पालघर येथे प्राणघातक हल्‍ला झाल्‍यानंतर उपचारादरम्‍यान सातार्‍यात तिचा मृत्‍यू झाला. ती पालघर जिल्‍हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्‍हणून कार्यरत होती. तिच्या मृत्‍यूनंतर कुटुंबीयांनी संताप व्‍यक्‍त करत संशयित अमोल मुळे (जि. बीड) याला फासावर लटकवा, अशी मागणी केली.

१२ जून रोजी पालघरमधील गोल्ड सिनेमा परिसरात स्‍नेहल हिच्यावर एकतर्फी प्रेमातून भरदिवसा कोयत्याने हल्ला झाला. हल्लेखोराने तरुणीच्या मानेवर व कमरेवर सपासप वार केले. हल्‍ल्‍याची घटना सीसीटीव्‍हीमध्ये कैद झाली. गंभीर जखमी अवस्‍थेत तिला रुग्णालयात दाखल केले. हल्ल्यानंतर संशयिताने घटनास्थळावरून पलायन केले. पालघर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाल्‍यानंतर तपासचक्रे गतिमान करून हल्‍लेखोर मुळेला पकडले.

स्नेहल हिच्यावर हल्ला झाल्‍याचे समजताच पुळकोटी येथील तिचे कुटुंबीय पालघर येथे गेले. स्‍नेहलवर उपचार सुरू झाल्‍यानंतर काही दिवसांनी तिला कुटुंबीयांनी सातार्‍यातील खासगी रुग्णालयात आणले. गेली सव्‍वा दोन महिने तिच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी तिचा मृत्‍यू झाला. यामुळे स्‍नेहलचे कुटुंबीय, नातेवाईकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली.

जमीन विकून उपचार

सावंत कुटुंबीयांची परिस्‍थिती हालाखीची आहे. अशातच तिच्यावर प्राणघातक हल्‍ला झाल्‍याने उपचारासाठी मोठी रक्‍कम लागणार होती. तिच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी हयगय केली नाही. उपचाराची रक्‍कम अव्‍वाच्यासव्‍वा असल्‍याने अखेर जमीन विकली व पैसे जमवले. स्‍नेहल बरी होईल या आशेवर गेली सव्‍वादोन महिने तिच्यावर उपचार सुरू होते. प्राथमिक माहितीनुसार उपचारासाठी ३५ लाख रुपये खर्च झाला आहे.

७ महिन्‍यांपूर्वी रुजू झालेली स्‍नेहल

स्‍नेहल हुशार असल्याने स्‍पर्धा परीक्षेचा ती अभ्यास करत होती. कुटुंबाची परिस्‍थिती बदलावी यासाठी ती प्रयत्‍न करत होती. ७ महिन्‍यांपूर्वी स्‍पर्धा परीक्षेद्वारे तिची लिपीक पदासाठी निवड झाली. मुलगी पालघर जिल्‍हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्‍यानंतर सावंत कुटुंबाच्या आनंदाला पारावर राहिला नाही; मात्र अवघ्या ७ महिन्‍यांत स्‍नेहलच्या स्‍वप्‍नांचा चक्‍काचूर झाला.

बहिणीवर हल्‍ला झाल्‍यानंतर उपचार सुरू ठेवले. यावेळी अनंत अडचणी आल्‍या. आता बहीण या जगात राहिली नाही. या प्रकरणाचा तपास चांगला होऊन हे प्रकरण फास्‍ट ट्रॅक कोर्टात चालावे. संशयिताला फाशीची शिक्षा व्‍हावी, अशी आमची मागणी आहे.
- संतोष सावंत, स्‍नेहलचा भाऊ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT