सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे दैनंदिन व्यवहारावरही परिणाम दिसून येत आहे. रविवारी सातारचे कमाल तापमान 40 अंशावर तर थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणार्या महाबळेश्वरचे कमाल तापमान 32.5 अंशावर होते.
सातारा जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा तीव्र स्वरुपात जाणवू लागल्या आहेत. सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे सुर्य आग ओकतोय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामानात होणारा बदल आणि उन्हाची वाढणारी तीव्रता यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होवू लागला आहे. त्यामुळे कामासाठी नागरिक सकाळ व संध्याकाळच्या वेळेसच बाहेर पडत आहेत. सकाळी 11 नंतर शहर व परिसरातील वर्दळीच्या रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे. महामार्गावरही तीच अवस्था आहे. सकाळी व सायंकाळच्या वेळेसच महामार्गावर वाहनांची वर्दळ आहे. मात्र भर दुपारच्या सुमारास वाहनचालक वाहने कुठेतरी उभी करुन विश्रांती घेताना दिसत आहेत.
मागील काही दिवसात उष्म्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. पाराही अधिक प्रमाणात वाढल्याने नागरिकांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांची लाहीलाही होत आहे. उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रीत करण्यासाठी अननस, मोसंबी, कलिगंड, कोकम, लिंबू पाणी, ऊसाचा रस, आईसस्क्रीम, ज्यूस यासारख्या शितपेयांकडे नागरिकांचा कल वाढला आहे. दुपारच्या वेळेत शरीरातून घामाच्या धारा निघत असल्याने नागरिकांना एसी, कुलर व फॅनचा आधार घ्यावा लागत आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे विविध रंगी बेरंगी टोप्या, गॉगल्स, सनकोंट यासह सुती कापडांना जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. रविवारी सातारचे कमाल तापमान 40 अंश तर किमान तापमान 22.4 अंश तर महाबळेश्वरचे कमाल तापमान 32.5 अंश तर किमान तापमान 20.7 अंशावर होते.