कराड : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 22 लाख 27 हजार 371 मतदारांचे मॅपिंग पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण 26 लाख 86 हजार 324 मतदारांपैकी सुमारे 82.92 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून उर्वरित 4 लाख 8 हजार 953 मतदारांचे मॅपिंग युद्धपातळीवर सुरू आहे.
जिल्हा निवडणूक विभागाने या मोहिमेसाठी व्यापक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये आठ मतदार नोंदणी अधिकारी, 3 हजार 165 बीएलओ तसेच 303 सुपरवायझर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीएलओंच्या माध्यमातून मतदार याद्यांमधील प्रत्येक मतदाराची माहिती तपासली जात असून 2002 च्या मतदार यादीशी तुलना करून मॅपिंग केले जात आहे. ज्या मतदारांचे नाव जुन्या यादीत उपलब्ध नाही, त्यांच्या पालकांच्या नावांच्या आधारे माहिती पडताळली जात आहे.
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार 20 ते 29 जून दरम्यान बीएलओंना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर 30 जून ते 29 जुलै या कालावधीत बीएलओ घरभेटीद्वारे माहिती संकलन करणार आहेत. 5 ऑगस्ट रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध होणार असून 4 सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर छाननी प्रक्रिया पूर्ण करून 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणूक विभागाने मॅपिंग प्रक्रियेला गती दिली आहे.