सिंदखेडराजा : राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या 428 व्या जयंतीनिमित्त मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे पालकमंत्री ना. मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांनी जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मस्थळी नतमस्तक होऊन अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासासाठी नवीन आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिली.
राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान हे प्रेरणादायी असून या ऐतिहासिक स्थळाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मातृतीर्थ सिंदखेडराजा विकास आराखडा नव्याने तयार करून शासनस्तरावर मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री मकरंद पाटील यांनी हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वरील सिंदखेडराजा इंटरचेंज फेज क्रमांक 7 येथे उभारण्यात येणाऱ्या बालशिवबासह राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली.
याप्रसंगी आ. मनोज कायदे, नगराध्यक्ष सौरभ तायडे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व दै. ‘पुढारी’चे निवासी संपादक हरीश पाटणे, सातारा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, उद्योजक दयानंद भोसले, ॲड नाझेर काझी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.