सातारा : कराड शहरातील शिवशंकर नागरी पतसंस्थेमध्ये संचालक मंडळाने संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तब्बल 13 कोटी 9 लाख 96 हजार 722 रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला आहे. शासनाच्या सहकार विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या वैधानिक लेखापरीक्षणात हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर 24 जणांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट कागदपत्रे तयार करुन विनातारण कर्जे वाटल्याचा ठपका या संशयित आरोपींवर ठेवण्यात आला आहे.
शरद मुंढेकर, शंकर स्वामी, महादेव बसरगी, दीपक कोरडे, उमेश मुंढेकर, सतीश बेडके, सुभाष बेंद्रे, दत्तात्रय शिंदे, ज्ञानेश्वरी बारटक्के, श्रीकांत आलेकरी, शिवाजी पिसाळ, महेश शिंदे, महालिंग मुंढेकर, मिलिंद लखापती, मनोज दुर्गवडे, वृषाली मुंढेकर, सुभाष बेंद्रे, प्रेमलता बेंद्रे, सिंधू जुगे, शंकर घेवारी, सर्जेराव लोकरे, सुनिल काशिद, संग्राम स्वामी, नितीन चिंचकर (सर्व रा. कराड शहर व तालुका परिसर), तात्यासो विभुते (रा. मल्हारपेठ, ता. पाटण) यांच्यावर या अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामध्ये संचालकांसोबतच व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, लेखापाल, रोखपाल, लेखनिक यांचाही या अपहारात सहभाग आहे.
विशेष लेखापरीक्षक धनंजय गाडे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात याबाबत फौजदारी दाखल केली. संस्थेच्या लेखापरीक्षणामध्ये निदर्शनास आलेल्या अपहाराबाबतचा अहवाल त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. त्यानुसार उपनिबंधक, कराड यांनी अहवाल तपासून अफरातफर करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.
संचालक मंडळ, व्यवस्थापक व सेवक वर्ग यांनी कर्तव्य पार न पाडता व पदाचा गैरवापर करून 13 कोटी 9 लाख 96 हजार 712 रुपयांचा अपहार केला. कर्ज वितरित करत असताना कर्जास कोणतेही तारण न घेता अपूर्ण कागदपत्राच्या तसेच बनावट कागदपत्राच्या आधारे कर्ज वाटप केले. त्यामुळे बँक खात्यातील शिल्लक कमी झाली. या अपहारामुळे संबंधितांच्या मालमत्तेवर शासनातर्फे टाच आणण्यात आली आहे. सहकार मंदिराचे चुकीचा कारभार करुन कसे लचके तोडले जातात, याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.