सातारा : वातावरणातील बदलामुळे तापमानाचा पारा घसरत आहे. जिल्ह्यातही गत चार दिवसांपासून थंडीचा कडाका कायम आहे. शुक्रवारी साताऱ्याचे किमान तापमान 9.4 अंश नोंदवण्यात आले आहे. शीत लहरींमुळे हवेत कमालीचा गारठा जाणवत होता. अवघ्या जनजीवनाला दिवसभरच थंडीने हुडहुडी भरली होती. दरम्यान, थंडीची तीव्रता सहन होत नसल्याने चिमुरडी तसेच वृद्धांमध्ये आरोग्याच्या तक्रारी बळावल्या आहेत.
उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने त्याचा परिणाम राज्यभर जाणवत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणात वारंवार बदल होत आहे. कधी ढगाळ हवामान, तर कधी कडक ऊन अशा विचित्र हवामानाचा जिल्हावासीय सामना करत आहेत. जिल्ह्यातही तापमानाचा पारा घसरला आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून तापमानातील घट कायम आहे. पुढील काही दिवस गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ही थंडीची तीव्रता वाढली आहे. दिवसभरच गारठा जाणवत आहे. थंडीच्या तीव्रतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शुक्रवारी साताऱ्याचे तापमान 9.4 अंशापर्यंत तर महाबळेश्वर वेण्णालेक व लिंगमळा परिसरात 8 अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून घटलेल्या तापमानात शुक्रवारी उच्चांक झाला आहे. शीत लहरी व थंडीच्या कडाक्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरत होती. नागरिकांना उबदार कपड्यांशिवाय बाहेरपडणे अशक्य होत होते.बोचऱ्या थंडीमुळे चिमुरड्यांसह वृध्द व व्याधीग्रस्तांमध्ये आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे आदि लक्षणे वाढली आहेत. संसर्गजन्य आजारांचे रुग्णसंख्या वाढू लागली आहे. कोरड्या हवेमुळे त्वचा रुक्ष होवून खाज सुटणे, हाता पायाच्या तळव्यांना चिरा पडणे, हातापायांची जळजळ होणे, टाचांना भेगा पडणे अशा तक्रारी वाढल्या आहेत.
थंडीमुळे सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्यादेखील कमी झाली आहे. रात्रपाळीत काम करणारे कमगार, वृत्तपत्र विक्रेते व इतर कष्टकऱ्यांंनी थंडीपासून बचावासाठी जागोजागी शेकोट्या पेटवल्या होत्या. थंडीत घशाला उब देण्यासाठी बसस्थानक, मार्केट यार्ड परिसरात चहाच्याटपरीवर रात्रीच्यावेळीदेखील गर्दी करत होते.