Shiv Sena Shinde group File Photo
सातारा

Satara politics: शिवसेना शिंदे गटाला भगदाड

सातारा शहर कार्यकारिणीचे राजीनामे; मेळाव्याआधीच फूट

पुढारी वृत्तसेवा

सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गांधी मैदानावर होणारा भव्य मेळावा तोंडावर आला असताना साताऱ्यात पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. शहरप्रमुख नीलेश मोरे यांनी दिलेल्या राजीनाम्याने केवळ एक पद रिकामे झाले नाही, तर शहरातील शहरप्रमुख ते बूथ प्रमुखांच्या सामूहिक राजीनाम्यामुळे संघटनाच हादरली आहे. या राजीनाम्याला ‌‘लेटर बॉम्ब‌’ असेच संबोधावे लागेल, कारण त्यातून उघड झालेले आरोप थेट पक्षाच्या अंतर्गत कारभारावर बोट ठेवणारे आहेत.

मोरे यांनी आपल्या राजीनामा पत्रातून संपर्क प्रमुखांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवला आहे. कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम करायचे आणि श्रेय-निधी मात्र नातेवाईकांना असा आरोप करण्यात आला आहे. विकास निधीच्या वाटपात झालेला कथित पक्षपात, नियोजन समितीतून ऐनवेळी नाव वगळणे आणि सातत्याने डावलण्याचा आरोप या सगळ्यांमुळे स्थानिक पातळीवरील असंतोष उघडपणे समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा बंडाचा सूर एखाद्या नाराज कार्यकर्त्याचा नसून कट्टर शिंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरे यांच्याकडून उमटला आहे.

साताऱ्यासारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यात आणि दोन्ही राजेंच्या विरोधात शिवसेनेची संघटनात्मक ताकद उभी करण्यासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांनाच जर दुय्यम वागणूक मिळत असेल, तर निष्ठा ठेवून काय उपयोग, असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला आहे. यामुळे ना. एकनाथ शिंदे निष्ठावंतांना न्याय देणार का, याकडे लक्ष लागले आहे.

मोरेंसह बूथ प्रमुखांचेही बंड

मोरे यांनी स्वतःचे संपर्क कार्यालय जिल्हा संपर्क कार्यालय म्हणून चालवले. स्वतःसह कुटुंबालाही पूर्णवेळ पक्षकार्यात झोकून दिले, तरीही वरिष्ठांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. हा राजीनामा पक्ष नेतृत्वासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. शहरातील अनेक बूथ प्रमुखांनीही पदाचे राजीनामे दिल्याने हा असंतोष वैयक्तिक न राहता संघटनात्मक बंडात परिवर्तीत झाला आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरच उघडकीस आलेला हा अंतर्गत संघर्ष शिंदे गटासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT