सातारा : ऐतिहासिक गांधी मैदान येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज सोमवारी सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. यामुळे सातारा शहर व परिसरात शिवसेना पदाधिकारी व पक्षाकडून बॅनर लावले आहेत. मात्र, लावलेल्या बॅनरवरून कोरेगावचे शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांचा फोटोच गायब झाला आहे. त्यावरून जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी झाल्या. या निवडीत भाजपने राष्ट्रवादी व शिवसेनेचे सदस्य फोडून सत्ता मिळवली. यामध्ये एकीकडे पालकमंत्री शंभूराज देसाई, ना. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे हे तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे असा संघर्ष झाला होता. यावेळी शिवसेनेचे आमदार असताना शिंदे यांनी शिवसेनेला साथ न देता भाजपला साथ दिली. यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हही उपस्थित झाले.
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर ना. शिंदे यांची सभा होत आहे. जिल्ह्याचे सुपुत्र असताना उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच साताऱ्यात पक्ष संघटना बांधणीसाठी येत आहे. ना. शिंदे यांच्या या पहिल्याच सभेसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट, अजंठा चौक, जिल्हा परिषद चौक, पोवई नाका, राजपथ, राजवाडा रस्त्याच्या दुतर्फा शाहूनगरीत स्वागताचे बॅनर लावले आहेत. मात्र, त्यावर आ. महेश शिंदे याचा फोटो गायब केला आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हांवरच आ. शिंदे हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. बॅनरवरून त्यांचा फोटो गायब झाल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.