सातारा

Satara Crime : शिरवळमधील तिघांची टोळी सातारा, पुणे जिल्ह्यांतून हद्दपार

गंभीर गुन्हे करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला सातारा पोलिसांनी सातारा व पुणे जिल्ह्यांच्या हद्दीतून वर्षासाठी हद्दपार केले

पुढारी वृत्तसेवा

शिरवळ : शिरवळ पोलिस ठाणे हद्दीत गंभीर गुन्हे करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला सातारा पोलिसांनी सातारा व पुणे जिल्ह्यांच्या हद्दीतून वर्षासाठी हद्दपार केले आहे.

टोळीप्रमुख ओंकार दत्तात्रय क्षीरसागर (वय २५), टोळी सदस्य वेदांत जितेंद्र जाधव (२०) व शुभम राजेंद्र भोई ( २१, सर्व रा. शिरवळ, ता. खंडाळा) यांच्याविरुद्ध दुखापत करणे, जबरी चोरी, चोरी यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करूनही गुन्हेगारी कारवाया सुरूच असल्याने शिरवळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश इंगळे यांनी हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरणाकडे सादर केला होता.

या प्रस्तावाची चौकशी फलटण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी केली. त्यानंतर पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासमोर टोळीची सुनावणी झाली. सुनावणीनंतर तिघांना संपूर्ण सातारा व पुणे जिल्हा हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला. खंडाळा तालुका परिसरातील नागरिकांना या टोळीचा उपद्रव होत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोका, एमपीडीए अशा कठोर कारवाया करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईसाठी अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तसेच शिरवळ पोलिस ठाण्याच्या अंमलदारांनी सरकार पक्षाच्यावतीने योग्य पुरावे सादर केले.

या टोळीची तडीपार कारवाईची प्रेसनोट मिळाल्‍यानंतर बातमी करणार्‍या पत्रकाराला जीवे मारण्‍याची धमकी वेदांत जाधव याने दिली आहे. याबाबत संबंधित पत्रकाराने खंडाळा पोलिसात तक्रार दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT