शिरवळ : पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या शिंदेवाडी गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या नीरा नदीच्या पात्रात पाण्यात पोहत असताना वैष्णव ऊर्फ नील संतोष जाधव (वय 22, रा. शिंदेवाडी ता. खंडाळा) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला.
नीरा नदीपात्रात शिंदेवाडी येथील काही तरुण पोहोण्याकरता गेले होते. यावेळी त्यांच्यासमवेत वैष्णव ऊर्फ नील जाधव हाही तरुण पोहोण्यासाठी गेला होता. मित्र नदीपात्रात पोहोत पुढे गेले. यावेळी पात्रात उतरलेला वैष्णव नदीपात्रात मध्यभागी आला. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ही घटना लक्षात येताच मित्रांनी शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वैष्णव हाताला लागला नाही.
घटनेची माहिती मिळताच तातडीने शिरवळ पोलिस, शिरवळ रेस्क्यू टीम तसेच भोर येथील भोईराज आपत्ती टीम यांना पाचारण केले. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर वैष्णव ऊर्फ नील जाधव याचा मृतदेह शोधण्यात यश आले. या घटनेची फिर्याद दीपक जाधव यांनी शिरवळ पोलिस ठाण्याला दिली असून, पोलिस अंमलदार संजय केंगले हे तपास करत आहेत.