सातारा : शेंद्रे गावच्या हद्दीत चारचाकी वाहनातून गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईत तब्बल २४ किलो ९६० ग्रॅम गांजा, दोन मोबाईल आणि टाटा नेक्सॉन कार असा एकूण १६ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. साहिल तानाजी चंदनशिवे (वय २५, रा. मांडवे, ता. खटाव) आणि वैभव रामलिंग गाडेकर (वय ३४, रा. उपळाई बुद्रुक, ता. माढा, जि. सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत.
सातारा तालुका पोलीस ठाण्याचे डीबी पथकातील पोलीस हवालदार राजू शिखरे यांना शेंद्रे परिसरात चारचाकी वाहनातून गांजा विक्रीसाठी दोन व्यक्ती येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी विशेष पथक तयार केले. शनिवार दि. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सातारा-शेंद्रे मार्गावरील खाणीजवळील सर्व्हिस रोडवर एमएच ११ डीएच ९३७१ क्रमांकाची टाटा नेक्सॉन कार पोलिसांनी अडवली.
वाहनातील दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच वाहनाची तपासणी करण्यास आडकाठी केली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर दोन पंचांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये २४ किलो ९६० ग्रॅम गांजा आढळून आला. त्याची किंमत सहा लाख २४ हजार रुपये असून १४ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि अंदाजे दहा लाख रुपये किमतीची कार असा एकूण १६ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव करत आहेत.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, पोलीस हवालदार मनोज गायकवाड, राजू शिखरे, दादा स्वामी, पंकज ढाणे, संदीप पांडव, चंद्रकांत माने, संदीप आवळे, सुनील भोसले तसेच फॉरेन्सिक पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली मोरे व त्यांच्या पथकाने केली. या कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पथकाचे अभिनंदन केले.