सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची प्रीती एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली असून, सोसायटी मतदारसंघातील ११ जागा प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीवर लढवणार आहे. या जागांवर कोणत्याही पक्षाने दुसऱ्या पक्षाला माघार घेण्यास सांगण्याचा प्रश्न नाही. उर्वरित जिल्हा मतदारसंघातील १० जागांसाठी संबंधित पक्षांकडे असलेल्या ठरावांच्या संख्येच्या आधारे जागावाटपाचे सूत्र निश्चित केले जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
महायुतीतील जागावाटपाबाबत सध्या विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, कोणत्या पक्षाकडे किती ठराव आहेत, याची अचूक आकडेवारी काढल्यानंतरच जागावाटपाचे सूत्र निश्चित केले जाणार आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडे असलेल्या ठरावांची संख्या तपासून त्यानुसार उर्वरित दहा जागांचे सूत्र ठरविण्यावर बैठकीत एकमत झाल्याचे ना. देसाई यांनी सांगितले.
तीन राष्ट्रवादी, सहा भाजप, एक शिवसेना असा फॉर्म्युला ठरल्याच्या प्रश्नावर ना. देसाई यांनी ही चर्चा चुकीची असल्याचे सांगितले. तसेच तिन्ही पक्षांचे संख्याबळ लक्षात घेतल्यानंतरच जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविला जाईल, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून एकत्रित लढवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महायुती म्हणूनच या निवडणुकीतील तिढा सोडवला जाईल, असेही ना. देसाई यांनी सांगितले.
जयकुमार गोरे बैठकीपासून दूर का?
मंत्री जयकुमार गोरे यांना महायुतीच्या चर्चेपासून वेगळे ठेवले जात आहे का?, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर ना. देसाई म्हणाले, ना. जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. सोलापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असून, दुष्काळी उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर गोरे यांना तेथे अधिक वेळ द्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांना या बैठकीला उपस्थित राहता आले नाही.
५ ऑक्टोबरनंतर पुन्हा बैठक
जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांकडून सध्या पक्षनिहाय ठरावांची आकडेवारी गोळा केली जात आहे. शिवसेनेच्यावतीने आ. रामराजे नाईक-निंबाळकर, ना. शंभूराज देसाई, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ना. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील यांच्याकडून आकडेवारी घेतली जात आहे. भाजपच्या ठरावांची संख्या ना. शिवेंद्रराजे भोसले आणि पक्षाचे आमदार तपासत आहेत. ही आकडेवारी एकत्रित आल्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी तिन्ही पक्षांची एकत्रित बैठक होणार असल्याचे सूतोवाचही ना. देसाई यांनी केले.