सातारा

Satara Chlorine Gas Leak: शानभागमध्ये क्लोरीन गॅस गळती; विद्यार्थी गुदमरले

सातारा शहरातील शानभाग शाळेत गुरुवारी दुपारी स्वीमिंग पूल स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा क्लोरीन गॅस लीक झाल्यामुळे काही विद्यार्थी गुदमरले

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा शहरातील शानभाग शाळेत गुरुवारी दुपारी स्वीमिंग पूल स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा क्लोरीन गॅस लीक झाल्यामुळे काही विद्यार्थी गुदमरले. बचाव कार्य करणार्‍या शिक्षकांनाही श्वास घेण्यास त्रास झाला. शाळा व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतल्याची तक्रार पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. याप्रकरणी शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

शानभाग शाळेत विविध खेळांसाठी मैदाने, पोहण्यासाठी स्वीमिंग पूलची व्यवस्था शाळा परिसरातच करण्यात आली आहे. याच स्वीमिंग पुलाच्या स्वच्छतेसाठी क्लोरीन गॅसचा वापर केला जातो. गुरुवारी दुपारी या क्लोरीन गॅसची गळती झाली. शाळेच्या परिसरात तीव्र वास पसरल्याने विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. शाळेतील शिक्षकांची एकच धावपळ उडाली.

विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढताना काही शिक्षकांनाही श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिस, अग्निशमन दल व प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती आटोक्यात आणली. इतर विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.

विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या पालकांना कळवण्यात आले. मुलांच्या जीवाशी खेळणार्‍या या शाळेची मान्यता शिक्षण विभागाने रद्द करावी, अशी मागणी पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT