मसूर : गावाच्या सामाजिक स्वास्थ्याला पोखरणार्या अवैध मद्यविक्रीविरोधात अखेर शामगावच्या महिलांनीच रणशिंग फुंकले आहे. दारूमुक्त गाव, सुरक्षित गाव हा निर्धार व्यक्त करत विशेष महिला ग्रामसभेत अवैध मद्यविक्री बंदीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. महिलांच्या या ठाम भूमिकेमुळे गावातील बेकायदा धंदे करणार्यांचे धाबे दणाणले असून, समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा निर्णय ठरला आहे.
शामगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष महिला ग्रामसभेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गावाच्या सामाजिक प्रश्नांवर थेट आवाज उठवला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विजय पोटोळे होते.
ग्रामविकास अधिकारी महेश सावंत यांनी ग्रामसभेच्या नोटीसचे वाचन करून सभेची सुरुवात केली. ग्रामसंघ अध्यक्षा रोहिणी पोळ, कृषी सखी शिला डांगे, सुशमा पोळ, मयुरी पोळ, शलाका पोळ, स्वागती फाटक, स्वागती पोळ यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. सदस्य राहुल यादव, बंडा पोळ, कृष्णात पोळ, गणेश पोळ, कृषी मित्र धनाजी जाधव यांनीही ग्रामसभेत सहभाग घेतला.
अवैध मद्यविक्री बंदीचा ठराव सीमा पोटोळे यांनी मांडला, तर मयुरी पोळ यांनी त्यास अनुमोदन दिले. त्यानंतर उपस्थित महिलांनी हात वर करून ठरावाला एकमुखी पाठिंबा दिला. कुटुंब उद्ध्वस्त करणार्या, युवकांना व्यसनाच्या गर्तेत लोटणार्या आणि गावातील शांतता भंग करणार्या अवैध मद्यविक्रीला आता महिलांनीच थेट आव्हान दिल्याने या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.यावेळी महिलांची सुरक्षा, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्यांवर कारवाई, स्वच्छता अभियान आणि कचरा व्यवस्थापन यासारखे ठरावही एकमताने मंजूर करण्यात आले.