Shambhuraj Desai vs Jaykumar Gore Pudhari
सातारा

Shambhuraj Desai : अघोरीबाबा कुठे मिळतो त्यांना विचारतो

शंभूराज देसाई यांचा जयकुमार गोरे यांच्यावर पलटवार : सारखी दमाची भाषा असेल तर समोर या

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दहा जागा बिनविरोध होऊन उर्वरित अकरा जागांवर निवडणूक झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सात जागा निवडून आल्या. मग कुणाच्यात दम आहे? सारखी सारखी दमाची भाषा केली जात असेल तर समोर या, चर्चा करायला तयार आहे. अघोरी बाबा कुठे मिळतो, हे त्यांना विचारतो. त्यांना त्याचा इलाज लागू पडला असेल तर त्‍यांच्‍याकडून माहिती घेतो, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर पलटवार केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक झाली. त्यानंतर जिल्हा बँक पदाधिकारी निवडीनंतर भाजपममधील नाराजीबाबत विचारले असता मंत्री देसाई म्हणाले, मी कसं सांगू? मला काहीच माहीत नाही. माझ्याबद्दल विचारले तर मी सांगू शकतो.जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालावर तुम्ही समाधानी आहात का? असे विचारले असता मंत्री देसाई म्हणाले, जिल्हा बँकेत महायुतीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे महायुतीतील सर्व पक्ष आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले.

दम होता तर निवडणुकीत समोरासमोर लढून दाखवायचे होते. मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी निवडणूक महायुतीतून लढवल्याचे मंत्री गोरे सांगत आहेत, याकडे लक्ष वेधले असता मंत्री देसाई म्हणाले, सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या म्हटलं तर काय घडलं यावर बोलावं लागेल. एवढीच दमाची भाषा असेल तर दहा जागा बिनविरोध होऊन उर्वरित अकरा जागांवर निवडणूक झालीच ना? अकरापैकी सात जागा राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या निवडून आल्या. मग कुणाच्यात दम आहे? आम्ही दमाची भाषा कधी केली नाही. माझ्याही वाचनात हे आलं आहे. मी राजकीय भाष्य करणार नव्हतो, पण बोललो नाही तर पत्रकार म्हणतील शंभूराज मूग गिळून गप्प बसले म्हणजे काहीतरी घोटाळा आहे! मला उघड बोलायची सवय आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडी जिल्ह्यानेे पाहिल्या आहेत, अशा शब्दांत मंत्री देसाई यांनी टीकास्र सोडले.

जिल्हा बँकेची निवडून स्वबळावर लढवली असती तर भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या असत्या, असे मंत्री गोरे यांच्या भूमिकेबद्दल विचारले असता मंत्री देसाई म्हणाले, तुमचं गणित कच्चं दिसतंय! १० जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित ११ जागांसाठी सर्व तालुक्यांतून मतदान होणार ना? पाच जागांमध्ये दोन महिला, ओबीसी, एनटी आणि मागासवर्गीय प्रत्येकी १ अशा पाच जागांना अकरा तालुक्यांतील ठरावधारक मतदान करणार ना? ७ जागांवर आम्ही निवडून आलो. मला आकडेवारी, गणित, बेरजेत जायचं नाही? पण जाणीवपूर्वक जर कुणी सारखी दमाची भाषा करत असेल तर कधीही त्यावर चर्चा करायला तयार आहे, अशा शब्दांत त्यांनी चॅलेंज दिले.

‘त्‍यांना’ अघोरी बाबाचा इलाज लागू पडलाय का?

अघोरी बाबाकडून जखमेवर जालीम उपाय केल्यावर ती चिघळते, अशी टीका मंत्री जयकुमार गोरे यांनी केली असल्याबाबत शंभूराज देसाई यांना विचारले असता ते म्हणाले, अघोरी बाबा कुठे मिळतो, हे त्यांना विचारतो. त्यांना त्याचा इलाज लागू पडला असेल तर त्यांच्याकडूनच माहिती घेतो, असा पलटवार त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT