सातारा : सातारा जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल आल्यानंतर शहर हादरून गेले. पोलिसांनी तत्काळ बॉम्बशोधक पथकासह चार तास संपूर्ण न्यायालयाची तपासणी केली. मात्र बॉम्बसदृश कोणतीही वस्तू सापडली नसल्याने खोटी धमकी दिल्याचे समोर आले आहे.
सोमवारी सकाळी नियमित वेळेत न्यायालयाचे कामकाज सुरू झाले होते. न्यायाधीश, वकील मंडळी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, पक्षकार न्यायालयात आले होते. यामुळे न्यायालयात वर्दळ होती. अशातच सकाळी ११.३० च्या सुमारास पंजाबी भाषेशी साधर्म्य असलेल्या भाषेत न्यायालय प्रशासनाला एक ई-मेल आला. त्यामध्ये ‘सातारा न्यायालय बॉम्बने उडवून देणार’, अशा आशयाचा मजकूर होता. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने तत्काळ सातारा पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह बॉम्बशोधक पथक, श्वानपथक, सातारा शहर पोलिसांसह इतर सर्वच विभागातील पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयातील सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. पोलिसांनी परिसर लॉक करत मोकळा केला. बॉम्बशोधक व श्वान पथकाने न्यायालयाचा प्रत्येक आवार पिंजून काढण्यास सुरुवात केली. न्यायालयाबाहेर असणारी सर्व वाहनांचीही तपासणी केली.
पोलिसांनी पहिल्या दीड तासामध्ये सर्व परिसरात सर्च ऑपरेशन राबवल्यानंतर प्राथमिक कुठे काहीही बॉम्बसदृश वस्तू आढळली नसल्याचे समोर आले. मात्र, आणखी दोनवेळा सर्व परिसर पिंजून काढणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार दुपारी साडेचारपर्यंत पोलिसांची शोध मोहीम सुरू होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलिस ठाण्यात ई-मेल करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.