Satara News: स्थानिकांची ढाल करत सेटलमेंटचे उद्योग Pudhari File Photo
सातारा

Satara News: स्थानिकांची ढाल करत सेटलमेंटचे उद्योग

लोकप्रतिनिधींच्याच बगलबच्यांचा सहभाग : गावासह तालुका अशांत

पुढारी वृत्तसेवा
पंकज नेवसे

शिरवळ : औद्योगिक वसाहतीचा जसा विस्तार होत आहे त्याप्रमाणे पोलिसांची संख्या शिरवळ व परिसरात वाढवली जात नसल्याने गुन्हेगारी वाढू लागला आहे. स्थानिक भुमिपुत्रांना नोकर्‍या का देत नाही यासह स्थानिकांच्या प्रश्नांची ढाल करून शिरवळसह सर्वच एमआयडीसींमध्ये सेटलमेट व खंडणी उकळण्याचे प्रकार वाढले आहे. यातून खून, मारामार्‍या, अपरहणाच्या घटना घडत आहे. याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना होत आहे. मात्र, यामध्ये लोकप्रतिनिधींच्याच बगलबच्यांचा सहभाग असल्याने हे प्रकार थांबणार तरी कधी? असा सवाल केला जात आहे.

शिरवळ परिसरात मोठया प्रमाणात कंपन्या आहेत. या ठिकाणी सातार्‍यासह पुण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा राबता असतो. कंपन्यांमधील बहुतांश अधिकारी हे पुण्यातीलच आहे. प्रारंभी स्थानिकांचे प्रश्न हातात घेवून कंपनीशी चर्चा करायची अन् त्यानंतर त्याच कंपनीशी सेटलमेंट करण्याचे उद्योग वाढू लागले आहे. यातूनच खंडणी मागण्याचे प्रकार वाढत आहेत. जर खंडणीला विरोध केल्यास त्या कंपनीची बदनामी करणे, अधिकार्‍याला मारहाण करणे असे प्रकार सर्रास वाढत आहेत. प्रामुख्याने भंगार विक्री आणि विविध प्रकारचे ठेके मिळवण्यासाठी कुरघोड्या सुरू आहे.

उद्योग-आधारित स्थलांतरणामुळे नवख्यांची गर्दी वाढू लागली आहे. त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक भेटत असल्याने गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. शिरवळ ते पुणे हे अंतर कमी असल्याने पुण्यातील तडीपार लोकांचा शिरवळ हा ठिय्याच झाला आहे. मात्र, ही तडीपार गुंड पोलिसांना मात्र सापडत नाही. मग कंपन्यांना कसे लुटायचे, ठेके कसे मिटवायचे, खंडणी गोळा कशी करायची याची शिकवणीच या गुंडाकडून घेतली जात आहे. परिणाम शिरवळ परिसरात क्राईम रेट वाढत आहे.

असे प्रकार करणार्‍या अनेक टोळ्या आहेत. यातूनच या टोळ्यांमध्ये गँगवार भडकत आहे. काहींना लोकप्रतिनिधींचाच पाठिंबा असल्याने बिनधोकपणे गुन्हे केले जात आहे. काही प्रकरणात गुन्हा दाखल झाला तरी त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा होत नाही. त्यामुळे मोक्का, तडीपारीच्या कारवायाही कमी होत आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहतींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

पोलिसांचा अ‍ॅक्शन प्लॅन करणे गरजेचा

औद्योगिक वसाहतींमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन करणे आवश्यक आहे. यामध्ये सर्व घटकांचा सहभाग घेवून पोलिसांनी कुणाच्याही दबावाखाली न येता काम करणे आवश्यक आहे. परंतु, सध्या तरी तसे होताना दिसत नाही. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्या मोकाट आहेत. कंपनी व्यवस्थापनाला या टोळ्यांकडून त्रास दिला जात आहे. हे असेच सुरू राहिल्यास मोठया कष्टाने उभे राहिलेले औद्योगिक साम्राज्य पुन्हा धुळीस मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT