धनंजय जगताप
मारूल हवेली : वणव्या बाबत वनविभाग जनजागृती करत असूनही सह्याद्रिच्या रांगेत असलेल्या डोंगरांना आग लावून जैवविविधतेची राखरांगोळी केली जात आहे. काही अज्ञांताकडून डोंगरांना आग लावण्याचे प्रकार सुरू असल्याने वनसंपत्तीचा वर्षानुवर्षे ऱ्हास सुरूच आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर पाटण तालुक्यातील अनेक डोंगर होरपळून काळेकुट्ट पडल्याचे चित्र दिसू लागले आहे.
पाटण तालुक्यातील विविध भागातील डोंगरांना आग लावण्याचे सत्र यावर्षीही कायम आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळा सुरू होण्याच्या तोंडावर डोंगर पेटविण्याच्या प्रकार घडत असतात. तर प्रत्येक वर्षी पावसाळ्यात वनविभागामार्फत हजारो रुपये खर्च करून डोंगर पट्ट्यात वृक्षारोपण करण्याचे काम केले जात आहे. मात्र डोंगर पेटविल्यानंतर पुढील वर्षी आपल्या जनावरांना चांगल्या प्रमाणे व जादा चारा उपलब्ध होतो. त्यामुळे अशा प्रकारे डोंगर पेटविण्याच्या घटना होत असल्याचे सांगितले जाते.
चैत्र पालवी फुटण्याच्या तोंडावर हिरवेगार दिसणारे डोंगर वणव्यामुळे काळेकट्ट दिसत आहेत. या आगीत कोट्यावधी रुपये खर्च करून नव्याने केलेली वृक्ष लागवड जळून खाक होत आहे. त्याच बरोबर लहान-मोठे लाखो प्राणीमात्रही जळून नाहीसे होत आहेत. शासनाने वृक्ष संवर्धनासाठी खर्च केलेले लाखो रूपये वाया जात आहेत.
दरवर्षी प्रमाणे डोंगरांना वणवा लागण्याचे प्रकार यावर्षीही कायम असल्याने वनसंपत्तीची वाढ होणार का? ही नेहमीचीच समस्या पुढे कायम राहणार अशी प्रतिक्रिया वनप्रेमीकडून होत आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे देशातील वनसंपत्तीत वाढ व्हावी व वन संवर्धन व्हावे यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करून प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्यास काही अज्ञानी व अज्ञात लोकांच्याकडून तिलांजली मिळत आहे. वन संरक्षणासाठी वन विभाग सक्रिय आहे, मात्र गेल्या आठ-पंधरा दिवसांपासून डोंगर रांगांतील भागात वणवा लागण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे. डोंगरात रात्रीच्या वेळी आगी लावल्या जात आहेत.
प्रत्येक वर्षी वनविभाग विविध जंगली झाडे लावून त्याची निगा राखण्यासाठी प्रयत्नशील असते. मात्र अशा प्रकारे प्रत्येक वर्षी लावलेल्या वणव्याने झाडे जळून खाक होत असून शासनाच्या कोट्यावधी रुपयांची राखरांगोळी होत आहे. वनविभागाच्या वनक्षेत्राला लागून अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. काही जमिनी आजही कसल्या जात आहेत. तर पडीक जमिनींमध्ये पाळीव जनावरांच्या चाऱ्यासाठी गवत घेतले जाते. जानेवारी अखेर डोंगरी भागातील गवत काढणी पूर्ण होऊन शिवार मोकळा केला जातो.
काही वेळेस शेतामध्ये पडलेला पालापाचोळा, बांधावरील गवताचे बुडके जाळले जातात. मात्र शेतकऱ्यांकडून योग्य ती काळजी घेतली जात नसल्यामुळे वनक्षेत्रात आगी लागल्या जात आहेत. काही अज्ञात व्यक्तीही पुढील वर्षी जनावरांना मुबलक चारा व्हावा या अज्ञानातून आगी लावत आहेत. यामध्ये वनसंपत्तीबरोरबच लाखो जीवजंतू मरण पावत आहेत. याबाबत शासनामार्फत गावोगावी प्रबोधन केले पाहिजे तसेच आग लावणाऱ्या व्यक्तीवर कठोर कार्यवाही केली पाहिजे असे मत निसर्गप्रेमींनी व्यक्त केले.