सातारा

Satara DJ Ban: साताऱ्यात डीजे विरोधात ज्येष्ठांचा उठाव; पोलिस मुख्यालयावर धडक

लेझरवरही कारवाईची मागणी : एसपींना दिले निवेदन

पुढारी वृत्तसेवा

सातारा : गणेशोत्सवाच्या उत्साहाला ध्वनी व प्रकाशाच्या अतिरेकाचे गालबोट लागू नये. यासाठी डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि तीव्र लेझर लाईटवर कठोर निर्बंध घालावेत, अशी मागणी साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांनी केली. यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पोलिस मुख्यालयावर धडक मारली.

कै. डॉ. कर्मवीर मार्तंडराव सूर्यवंशी (चाचा) फौंडेशन व सातारा समन्वय समितीच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये म्‍हटले आहे की, गणेशोत्सवात मिरवणुका व विविध कार्यक्रमांदरम्यान ध्वनिक्षेपकांचा मोठ्या आवाजात वापर केला जातो. अनेकदा रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, हृदयरुग्ण, विद्यार्थी, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना त्रास सहन करावा लागतो. झोपेचा अभाव तसेच मानसिक तणावासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.

गणेशोत्सवातील लेझर शोमधून होणाऱ्या तीव्र प्रकाशझोतामुळे नागरिकांच्या डोळ्यांना त्रास होतो. दूरगामी त्‍याचे परिणाम असून राज्यात अनेक ठिकाणी डोळ्यांना दुखापत झाल्‍याच्या घटना घडल्‍या आहेत. त्यामुळे लेझरच्या वापराबाबतही प्रशासनाने स्पष्ट नियम आखून त्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ सदस्यांनी पोलिसांकडे केली आहे.

पारंपारिक वाद्यांना प्राधान्य द्या

गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असून त्याचे स्वरूप ध्वनी-प्रकाशाच्या स्पर्धेत बदलू नये. मंडळांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन ज्येष्ठ नागरिकांनी केले. नियमभंग करणाऱ्या मंडळांवर वेळ न दवडता कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT