Temperature Pudhari
सातारा

Satara News: रखरखत्या उन्हामुळे उन्हाळी सुट्टीवर परिणाम

सुट्टीमधील सहलींचे नियोजन पुढे; वयोवृध्द, बालकांचे उष्णतेने हाल

पुढारी वृत्तसेवा

मारूल हवेली : यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने विक्रमी पातळी गाठल्यामुळे मुलांच्या उन्हाळी सुट्टीवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यापासूनच तापमान 41 अंश सेल्सिअसकडे गेल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः लहान मुलांना या तीव्र उष्णतेचा अधिक त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या आरोग्यावरही त्याचे परिणाम जाणवत आहेत.

दरवर्षी मे महिन्यातील उन्हाळी सुट्टी म्हटली की मुलांसाठी आनंदाचा पर्व असतो. मैदानी खेळ, गावाकडे जाणे, नातेवाईकांना भेटी, सहली, पोहण्याचे वर्ग, तसेच विविध छंदवर्ग आणि शिबिरे यामध्ये मुले उत्साहाने सहभागी होत असतात. मात्र, यंदा कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणेच धोकादायक ठरत आहे. परिणामी, मुलांचा बहुतांश वेळ घरातच जात असून त्यांच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्या आहेत.

याचा थेट परिणाम मुलांच्या आरोग्य आणि मानसिक स्थितीवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दिवसभर घरात राहिल्यामुळे मुलांचा मोबाईल, टीव्ही आणि व्हिडिओ गेम्सकडे कल वाढला आहे. यामुळे डोळ्यांचे विकार, चिडचिडेपणा आणि झोपेच्या समस्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तीव्र उन्हामुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी बाहेर जाण्याच्या वेळांवर निर्बंध घातले आहेत. सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा थोड्या वेळासाठीच मुलांना खेळण्याची परवानगी दिली जात आहे. काही पालकांनी तर उन्हाळी सहलींचे नियोजनही पुढे ढकलले आहे.

दरम्यान, अनेक ठिकाणी उन्हाळी शिबिरे, क्रीडा उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत किंवा त्यांची वेळ बदलून सकाळी लवकर ठेवण्यात आली आहे. काही शाळा आणि संस्थांनी ऑनलाइन वर्ग, कार्यशाळा आणि स्पर्धांचे आयोजन करून मुलांना पर्यायी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

उन्हाळी सुट्टी म्हणजे बाळगोपाळांसाठी मज्जा, मस्ती, खेळ आणि निवांतपणाचा काळ असतो. अभ्यासाचे ओझे नसल्यामुळे मुलांच्या आनंदाला उधाण येते. मात्र, वाढत्या तापमानामुळे या पारंपरिक आनंदावर काही प्रमाणात मर्यादा आल्या आहेत. तरीही योग्य नियोजन, आरोग्याची काळजी आणि सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून ही सुट्टी सुरक्षित, आनंददायी आणि उपयुक्त बनवता येऊ शकते, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT