Gram Panchayat Pudhari
सातारा

Satara News : जिल्ह्यातील 865 ग्रामपंचायतींवर सरपंच प्रशासक

ग्रामविकास विभागाचा निर्णय : जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यातील 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत सुमारे 865 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतींवर आता सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार आहे. याबाबतचा ग्रामविकास विभागाने शनिवारी शासन निर्णय जारी केला आहे. ग्रामविकास विभागाचे अवर सचिव बाबुराव आसोले यांनी याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील 125, कोरेगाव 56, खटाव 90, माण 61, फलटण 80, खंडाळा 57, वाई 76, महाबळेश्वर 40, जावली 72, कराड 102, पाटण 106 असे मिळून 865 ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी 2026 मध्ये संपत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींवर सरपंचांनाच प्रशासक नेमण्यात यावे याबाबत ग्रामविकास विभागाला निवेदन दिले होते. तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. याबाबत याचिकाही दाखल करण्यात आली होती. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत प्रशासक पदाचा गुंता सोडवला आहे. आता ज्या ग्रामपंचायतीची मुदत दि. 28 फेब्रुवारीपर्यंत संपत आहे. त्या ठिकाणी विद्यमान सरपंचालाच ‌‘प्रशासक‌’ म्हणून नेमले जाणार आहे. यामुळे ग्रामपातळीवरील प्रशासनात सातत्य राहणार आहे.

यापूर्वी जानेवारी महिन्यात काढलेल्या परिपत्रकानुसार 2026 मध्ये संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, राज्यातील ग्रामपंचायतींची मोठी संख्या आणि विस्तार अधिकाऱ्यांची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता प्रशासनासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे सरकारने सुधारित निर्णय घेतला आहे.

प्रशासक आणि प्रशासकीय समितीचा कालावधी त्यांच्या नेमणुकीपासून सहा महिने किंवा संबंधित ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्ण होईपर्यंत जे आधी होईल तेवढा राहणार आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार हा निर्णय सध्या 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठीच लागू राहणार आहे. या कालावधीत प्रशासक आणि प्रशासकीय समिती नेमण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे असतील.

सरपंच परिषद, पुणे, महाराष्ट्रने ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदासाठी अभ्यासात्मक लढाई सुरू केली आणि शनिवारी शासनाने आदेश काढल्यामुळे जिंकली आहे. महाराष्ट्रातील सर्व गोरगरीब जनतेला यामधून न्याय मिळणार आहे. सरपंच हा गावामध्ये राहणारा व्यक्ती असल्याने तो वेळोवेळी सहज उपलब्ध होतो. गावातील गोरगरीब लोकांच्या कामी येतो, हे आम्ही सरकारला व न्याय देवतेला पटवून दिले. तसेच न्यायालयात योग्य पुरावे सादर केल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व सरपंचांना न्याय मिळाला आहे.
- जितेंद्र भोसले, प्रदेशाध्यक्ष, सरपंच परिषद, पुणे, महाराष्ट्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT