बाळू मोरे
कण्हेर : कण्हेर (ता.सातारा) येथील डोंगर पायथ्याशी वसलेल्या सारखळ, गवडीसह परिसरातील वाड्या-वस्त्यांवर अनेकदा बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिक सावधपणेच वावरत आहेत. शेतकरी व महिला रानात जाताना काळजी घेत आहेत. बिबट्याचा हल्ला होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. याकडे वनविभागाने लक्ष देवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. पिकांना रात्रंदिवस पाणी द्यावे लागत आहे. पिकांना पाणी देताना रात्री-अपरात्री शेतामध्ये या बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना वारंवार झाले आहे. या बिबट्याची परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली असून, तेथील रहिवासी जीव मुठीत धरून शेतामध्ये काम करत असतात.
कण्हेर परिसरातील सारखळ, जांभळेवाडी, गवडी, चोरगेवाडी, या परिसरात दाट झाडी असून बिबट्याचा वावर अनेकदा आढळून आला आहे. याठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी धरण व वेण्णा नदीतून शेतीसाठी पाणी पुरवठा योजना केलेल्या आहेत.
या गावांच्या शेजारील डोंगरांमध्ये बिबट्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. त्यामुळे शेतामध्ये काम करताना अनेकांनी त्याला पाहिला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांच्या गोठ्याजवळ बिबट्या फिरकल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी व रहिवाशांची घाबरगुंडी उडाली आहे. बिबट्याच्या भीतीने शेतीकामात व्यत्यय येत असून बिबट्याचा वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा,अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.