सातारा : विधानपरिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीतील महायुतीमधील घटक पक्षांना भाजपने अगोदर संघर्ष करायला लावला. अन् त्यांच्याच मतांचा उपयोग या निवडणुकीत करुन घेतला. तरीही अपेक्षित संख्याबळाच्या जवळ ते पोहोचले नाहीत.
जवळपास १०० मते महायुतीतून फुटून विरोधात गेल्याचे चित्र निवडणूक निकालाची आकडेवारी सांगत आहे. भाजप आणि सोबतच्या सर्व सहकाऱ्यांची मिळून ६९३ इतकी मते धैर्यशील कदम यांना पडायला हवी होती. मात्र, त्यात सुमारे १०० मतांची घट झाली. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेनेतील नाराजांनी भाजपला टांग मारली की स्थानिक आघाडीतील सहकाऱ्यांनी गप्प बसून भाजपला चिमटा काढला. याबाबत प्रश्नचिन्ह निवडणुकीच्या निकालानंतर उभे राहिले आहे.
सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल पाहिला तर तो केवळ धैर्यशील कदम यांच्या विजयाचा नाही, तर दोन्ही बाजूंच्या राजकीय व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यास भाग पाडणारा आहे. एकूण ८९५ मतदारांपैकी ८९४ जणांनी मतदान केले. यामध्ये धैर्यशील कदम यांना ५९३ तर अभयसिंह जगताप यांना २९२ मते मिळाली.
महाविकास आघाडीच्या दृष्टीने पाहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि स्वाभिमानी पक्ष यांची एकत्रित ताकद सुमारे १७७ मतांची होती. याशिवाय आघाडीतील सहकारी आणि अपक्ष मिळून आघाडीची ताकद १९९ पर्यंत जाते. अभयसिंह जगताप यांना मिळालेली २९२ मते म्हणजे तब्बल ९३ मतांची अतिरिक्त भर पडल्याचे दिसते. संख्याबळ कमी असतानाही एवढी अतिरिक्त मते मिळवणे, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा संपर्क, समन्वय आणि राजकीय व्यवस्थापनाचे यश मानावे लागेल.
दुसरीकडे महायुतीकडे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित संख्याबळाची आकडेवारी सुमारे ५७९ मतांची होती. याशिवाय आघाडी आणि अपक्ष म्हणून लढलेले मात्र मुळचे महायतीत असलेले सहकारी यांची गोळाबेरीज ६९३ मतांपर्यंत जाते. मात्र धैर्यशील कदम यांना ५९३ मते मिळाली. महायुतीच्या मूळ ताकदीपेक्षा १०० मते कमी मिळाली. त्यामुळे महायुतीतील मते फुटल्याचीच चर्चा सुरू आहे. आता ही १०० मते स्थानिक आघाडीतील सहकाऱ्यांची, अपक्षांची की मूळ महायुतीतील नाराजांची याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
या निवडणुकीतील खरा संघर्ष अपक्ष, स्थानिक आघाड्या आणि स्वतंत्र गटांची मते मिळवण्याचा होता. अपक्षांची सुमारे ५२ मते, विविध स्थानिक आघाड्यांची सुमारे ५९ मते तसेच संजयकाका पाटील गटाची २९ मते यांच्यावर दोन्ही बाजूंचे लक्ष केंद्रित होते. महाविकास आघाडीने आपल्या मूळ ताकदीपेक्षा ९३ मते अधिक मिळवून राजकीय प्रभाव सिद्ध केला असला, तरी भाजपने आखलेली व्यापक रणनीती निर्णायक ठरली. भाजपने केवळ महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मतांवर विसंबून न राहता अपक्ष, स्थानिक आघाड्या आणि विविध प्रभावी गटांशी संपर्क वाढवला. त्यामुळे धैर्यशील कदम यांचा विजय अधिक भक्कम झाला.