Maharashtra Politics 
सातारा

Maharashtra Politics : धैर्यशील की अभयसिंह?

सातारा - सांगलीचा संयुक्‍त आमदार कोण?

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी आज, गुरुवार, दि. १८ जून रोजी मतदान होत असून महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. गेल्या महिनाभरापासून दोन्ही उमेदवारांनी विजयासाठी मोर्चेबांधणी केली असून निकाल २२ जून रोजी जाहीर होणार आहे. धैर्यशील जिंकणार की अभयसिंह? याबाबत आता पैजा लागू लागल्‍या असून सातारा - सांगली विधान परिषद मतदारसंघाचा संयुक्‍त आमदार कोण? याची उत्‍सुकता शिगेला पोहोचली आहे.

महायुतीच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर कदम यांना उमेदवारी देण्यात आली. तर महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जगताप यांना मैदानात उतरवले. माण-खटावच्या दुष्काळी पट्ट्यातील या दोन्ही नेत्यांनी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे ८९५ मतदारांपर्यंत पोहोचून आपापल्या भूमिका मांडल्या.

कदम यांच्या प्रचारासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, आ. अतुल भोसले, आ. मनोजदादा घोरपडे, आ. महेश शिंदे, आ. गोपीचंद पडळकर, आ. सदाभाऊ खोत, सम्राट महाडिक, पृथ्‍वीराज देशमुख यांनी जोरदार प्रयत्न केले. महायुतीतील समन्वय साधण्यासाठी भाजप वरिष्ठ नेतृत्वानेही सक्रिय भूमिका घेतली. अखेरच्या टप्प्यात ना. मकरंद पाटील आणि ना. देसाई यांनीही आपल्या सदस्यांना युतीधर्म पाळण्याचे निर्देश देत कदम यांना पाठिंबा जाहीर केला. दुसरीकडे जगताप यांच्या विजयासाठी आ. जयंत पाटील, प्रदेशाध्‍यक्ष शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, आ. विश्वजित कदम, खा. विशाल पाटील आणि आ. रोहित पाटील यांनी जोरदार खिंड लढवली. जिल्हा परिषद निवडणुकांतील राजकीय संघर्ष आणि भाजप विरोधातील नाराजीचा मुद्दा पुढे करत महायुतीतील नाराज मतदारांना वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना सदस्यांची भूमिका. भाजपने मतदारांची काटेकोरपणे बांधणी करत त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. मात्र, काही घटक पक्षांच्या सदस्यांपर्यंत पाठिंब्याचे आदेश उशिरा पोहोचल्याने ते प्रत्यक्ष मतदानात कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

विजयाची 'मॅजिक फिगर' कोण गाठणार?

मतदारसंघातील एकूण मतदार संख्या ८९५ आहे. त्यामध्ये भाजपचे ३३२, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे १४७, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ९८, शिवसेना (शिंदे गट)चे १००, काँग्रेसचे ७३, अपक्ष ५२ आणि उद्धव ठाकरे गटाचे ५ मतदार आहेत. आघाडीचे ५९, तर संजयकाका पाटील गटाचे २९ मतदार आहेत. कागदोपत्री पाहता महायुतीकडे भाजप, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट अशी एकत्रित सुमारे ५७९ मतांची ताकद आहे. तर महाविकास आघाडीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि काही अपक्ष असे मिळून सुमारे १७६ मतांचे गणित दिसते. या परिस्‍थितीत विजयासाठीची मॅजिक फिगर कोण जुळवणार? याबाबत उत्‍सुकता ताणली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT