साखरवाडी : साखरवाडी-सुरवडी या महत्त्वाच्या मार्गावरील दुरवस्थेबाबत दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
खडी टाकून व रोलरच्या साहाय्याने रस्ता दुरुस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे. साखरवाडी-सुरवडी गावांना जोडणारा हा मार्ग फलटणकडे जाण्यासाठी तसेच सुरवडी येथील एमआयडीसी परिसरात कामासाठी जाणाऱ्या हजारो कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र अवघ्या दोन वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आलेल्या या रस्त्याची अल्पावधीतच चाळण झाली होती. ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. दुचाकीस्वारांसाठी तर हा मार्ग जीवघेणा ठरत होता. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती नागरिक व्यक्त करत होते.
याबाबत वारंवार तक्रारी करुनही संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर होता. दरम्यान, या समस्येबाबत दैनिक ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेतली. सध्या संबंधित ठिकाणी खडी टाकून खड्डे बुजवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. रोलरद्वारे दाब देऊन रस्ता सपाट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रस्त्यावरील दुरुस्तीची कामे सुरू झाल्याने ग्रामस्थ व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार आणि टिकाऊ दुरुस्ती करावी, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.