साखरवाडी : अल्पवयीनांकडून दुचाकी चालवण्याच्या वाढत्या घटनांवर प्रकाश टाकणाऱ्या दैनिक ‘पुढारी’मधील वृत्ताची प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी साखरवाडी येथील बसस्थानक परिसरात विशेष मोहीम राबवत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली. या मोहिमेत एकूण 22 वाहनचालकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून साखरवाडी परिसरात अल्पवयीन मुलांकडून बेदरकारपणे दुचाकी चालवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत सायंकाळी बसस्थानक परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरु केली. कारवाईदरम्यान बिनापरवाना वाहन चालवणे, ट्रिपल सीट प्रवास तसेच अल्पवयीनांकडून वाहन चालवणे अशा प्रकारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. अनेक अल्पवयीन चालकांना समज देण्यात आली असून त्यांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणाऱ्या पालकांवरही कारवाई केली जाणार आहे. अशा प्रकारांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. तसेच पुढील काळातही अशा धडक मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत महिला पोलिस उपनिरीक्षक नागवडे यांच्यासह पोलिस हवालदार महादेव पिसे, अरुण शेंडे, संजय अडसूळ, पोलिस कॉन्स्टेबल कल्पेश काशीद, सूचित मेंगावडे, तानाजी ढोले आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.