सातारा : जिल्ह्याला निसर्ग सौंदर्याचे कोंदण लाभल्याने पर्यटनासाठी पर्यटकांकडून नेहमीच जिल्ह्यातील ठिकाणांना प्राधान्य दिले जाते. पर्यटनाबरोबरच विविध वाहिन्यांवरील मालिकांच्या चित्रीकरणासाठीदेखील सातारा उपनगरासह परिसरातील ग्रामीण भागातील निसर्ग सौंदर्याची भुरळ पडत आहे. गेल्या काही वर्षात गाव-खेड्यातही ‘कॅमेरा.. ॲक्शन.. कट’चा आवाज सहज कानी पडत आहे. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळत आहेत.
गतकाही वर्षांमध्ये केवळ उन्हाळ्यात दररोज प्रसारित होणारी मालिका आता वर्षभर दररोज दाखवण्यात येत आहे. त्यामुळे जाहिरात प्रसारणाला प्रेक्षक मिळत आहेत. मनोरंजन क्षेत्रात दूरचित्र प्रसारण वाहिन्यांची संख्या वाढली असून प्रेक्षकांनाही या वाहिन्यांवरील मालिकांचा लळा वाढत आहे. अनेक पात्र स्वत: जगत आहेत. पूर्वी चित्रपट मालिकांचे चित्रीकरण हे पुणे, मुंबई, कोल्हापूर अशा मोठ्या शहरांमध्ये होत असे. या टीआरपी व बदलत्या आवडीनिवडीनुसार चित्रपट, मालिका निर्माते, दिग्दर्शकांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे.
सातारा शहर परिसर, उपनगर तसेच आसपासच्या गावखेड्यांमध्ये मालिका, वेबसिरीजचे शूटिंग होत आहे. त्यामध्ये ग्रामीण कलाकारांना छोट्या-मोठ्या भूमिका करायला व जगायला मिळत आहे. तसेच मालिका व कलाकारांशी निगडीत वस्तू, सेवांमधून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. काही मालिकांचे जिल्ह्यातील काही गावांमध्ये महिनोंमहिने शूटिंग सुरु राहते. त्याची माहिती वाऱ्यासारखी पसरते. त्यामुळे शहरातील नागरिक ते शूटिंग त्यासाठी वापरातील घर व परिसराला आवर्जून भेट देतात. त्यामुळे नकाशाशिवाय फारशी दखल न घेतलेली अनेक गावे प्रसिद्धीच्या झोतात आली आहेत. तसेच चित्रिकरणाच्या निमित्ताने सोयीसुविधा उपलब्ध झाल्याने मागासलेपण कमी होत आहे.