सातारा : सातारा जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन विभागाच्या ‘वायू वेग’ पथकाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. नियमांची अंमलबजावणी करण्याऐवजी मनमानी पद्धतीने कारवाया केल्या जात आहेत. पैसे उकळण्याऐवजी नियमबाह्य कार्यवाही करून दंड केला जात असल्याचा आरोप चालकांकडून केला जात आहे. काही ठिकाणी अधिकृत दंडाऐवजी ‘सेटलमेंट’च्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आरटीओच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयासह कराड आणि फलटण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत सुमारे दहा ‘वायू वेग’ पथके जिल्हा मार्ग, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवर वाहनांची तपासणी करतात. मात्र, कारवाई करताना नियमांचा एक निकष आणि प्रत्यक्षात दुसराच निकष वापरला जात आहे.
अलीकडेच राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकवर कारवाई करताना वाहनाची वजन तपासणी अधिकृत काट्यावर न करताच ओव्हरलोडचा ठपका ठेवून तब्बल १४ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. सर्व कागदपत्रे वैध असतानाही आपले म्हणणे ऐकून न घेता कारवाई करण्यात आल्याचा आरोप संबंधित ट्रक चालकाने केला आहे. काटा न दाखवता ओव्हरलोड कसं ठरवलं? असा सवाल चालक उपस्थित करत आहेत. नियमांनुसार वजनाची खात्री करूनच दंडात्मक कारवाई होणे अपेक्षित असताना काही प्रकरणांत त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
मालवाहतूक व्यावसायिक आणि ट्रकचालकांना अधिकृत दंड भरण्याऐवजी 'सेटलमेंट'वर भर दिला जात आहे. मात्र ते न मानणाऱ्यांवर मोठ्या रकमेचा दंड आकारला जातो. या दाव्यांची स्वतंत्र पडताळणी झालेली नसली तरी अशा तक्रारी सातत्याने पुढे येत असल्याने परिवहन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह केले जात आहे.